महालक्ष्मी पूल ठरताेय अपघातांचे हॉटस्पॉट

महालक्ष्मी पूल ठरताेय अपघातांचे हॉटस्पॉट

Published on

कासा, ता. २७ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील महालक्ष्मी पुलाजवळ सलग दोन दिवस वाहनांचे अपघात घडले आहेत. दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली, मात्र महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच असून, वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

पहिली घटना शनिवारी (ता. २६) दुपारी १२.२५ वाजता महालक्ष्मी पुलाजवळच घडली. एका ट्रकने खड्डा चुकविण्यासाठी अचानक ब्रेक घेतला. यामुळे त्यामागून येणाऱ्या ट्रेलर (जीजे ०३ बीडल्ब्यू ८९९३) ने त्याला जोरात धडक दिली. या अपघातातही कोणतीही दुखापत झाली नाही. दोन्ही वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला करण्यात आली आणि वाहतूक पूर्वपदावर आली.

दुसरी घटना रविवारी (ता. २७) पहाटे ५ वाजता घडली. ट्रेलर (क्र. जीजे १६ एडब्ल्यू ७८८९) गुजरातच्या दिशेने जात असताना महालक्ष्मी पुलाच्या सुरुवातीला खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रेलर महामार्गावर कोसळला. या ट्रेलरमध्ये रासायनिक द्रव्य भरलेले होते. सुदैवाने गळती झाली नाही आणि मोठा धोका टळला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

महामार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेक अपघात वारंवार घडत आहेत. महामार्ग प्राधिकरणाने ठेकेदारांना खड्डे बुजवण्याच्या सूचना दिल्या असल्या तरीही अनेक ठिकाणी केवळ तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी केली जात आहे. त्यामुळे काही दिवसांतच हे खड्डे पुन्हा उघडे पडतात. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढत आहे. महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे वाहनचालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, प्रशासनाने त्वरित आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com