मरणोत्तर मरणयातना
मोखाडा, ता. २७ (बातमीदार) : तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या कुर्लोद ग्रामपंचायतीतील जांभूळपाडा येथे स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांना पार्थिवावर उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात; मात्र मुसळधार पाऊस कोसळत असताना पार्थिवावर ताडपत्रीचे आच्छादन करून अंत्यसंस्कार करावे लागल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.
कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीत एकूण नऊ गावपाडे आहेत. हे सर्व गावपाडे वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले असून येथील लोकसंख्या तीन हजारांच्या दरम्यान आहे; मात्र या गावपाड्यांत केवळ तीनच स्मशानभूमी आहेत. येथील आदिवासी बांधवांपर्यंत अजूनही प्राथमिक सुविधा मिळालेल्या नाहीत. वर्षानुवर्षे येथील आदिवासी कठीण परिस्थितीत आपले जीवन जगत आहेत.
जांभूळपाडा येथील यमुना फुफाणे या महिलेचा शुक्रवारी (ता. २५) मृत्यू झाला. स्मशानभूमी नसल्याने आणि मुसळधार पावसाने नातेवाइकांसह नागरिकांना तिच्या पार्थिवावर प्लॅस्टिकच्या ताडपत्रीचे आच्छादन करून उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागले. आदिवासी बांधवांना जिवंत असताना आणि मरणानंतरही प्राथमिक सेवा उपलब्ध नसल्याने मरणयातना भोगाव्या लागत आहेत.
प्रस्ताव अडकला लालफितीत
२०२४-२५ मध्ये कुर्लोद ग्रामपंचायतीतील दोन गावांसाठी ठक्कर बाप्पा योजनेतून स्मशानभूमी बांधण्यासाठीचे प्रस्ताव जव्हार येथील आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडे सादर केले होते; परंतु ते मंजूर झालेले नाहीत. त्यामुळे हे प्रस्ताव प्रलंबित असल्याचे ग्रामविकास अधिकारी निखिल बोरसे यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीसह अनेकवेळा वेगवेगळ्या माध्यमांतून प्रस्ताव सादर केले आहेत; मात्र प्रस्ताव रखडलेले आहेत. चालू आर्थिक वर्षात कोणत्याही परिस्थितीत बहुतांश ठिकाणी स्मशानभूमीची शेड मंजूर करण्याबाबत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.
- मोहन मोडक, सरपंच, कुर्लोद ग्रामपंचायत