खडतर आव्हानांचा प्रवास

खडतर आव्हानांचा प्रवास

Published on

वसई, ता. २७ (बातमीदार) : महापालिका प्रशासनाकडून चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी नागरिक प्रामाणिकपणे कर देतात; मात्र पावसाळा येताच काही दिवसांपूर्वी दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी खर्च केलेल्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे दिसतात. त्या खड्ड्यांतून प्रवास करताना कोंडी आणि रात्रीच्या वेळी होणाऱ्या अंगदुखीचा सामना शहरातील नागरिकांना करावा लागत आहे. वसई-विरार शहरासह तालुक्याच्या बाहेर जाणाऱ्या रस्त्यांची चाळण झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने आव्हानात्मक प्रवास करीत आपले जीवन जगत असल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

वसई-विरार महापालिका हद्दीसह तालुक्याबाहेर जाणाऱ्या प्रमुख मार्गांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वसई पूर्वेकडे प्रवास करताना अंबाडी पुलाखाली खड्ड्यांचे दर्शन प्रवाशांना होते. सातिवली, वालीव, भोईदापाडा, वसई फाटा, गोलानी मार्गावर कोंडी होऊन वाहतूक व्यवस्था कोलमडते. विरार महामार्गावरून शिरसाड, वज्रेश्वरी, अंबाडी, गणेशपुरी मार्गाकडे जाणारे रस्ते गेले कुठे, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. कामण-चिंचोटी मार्गाचा प्रवास धोकादायक झाला आहे, याचबरोबर मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या आजूबाजूला चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

एकीकडे लांबचा प्रवास करण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध नाहीत. त्यामुळे पालघर, गुजरात, मुंबई, ठाणे, भिवंडी मार्गावरून ये-जा करण्यासाठी रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे या रस्त्यांवर वर्दळ जास्त असते. शहरातील रस्ते सुसज्ज आणि जास्त टिकावू असणे गरजेचे आहे; परंतु वसईमध्ये असे दिसून येत नाही. परिणामी, पावसाळ्यात प्रवास अतिशय कठीण होते.

निर्मळ-भुईगाव मार्ग खड्ड्यांत
वसई, विरार, नालासोपारा जोडणारा निर्मळ-भुईगाव मार्गावर मोठमोठे खड्डे चालकांसाठी आव्हान ठरत आहेत. काही दिवसांपूर्वी येथून जात असताना खड्डे वाचवताना गाडी उलटली होती. त्यामुळे पालकांसह विद्यार्थिनी जखमी झाल्या. काही जणांचे दप्तर, कपडे घाण झाल्याने शाळेला जाता आले नाही.

महामार्गाला कोंडीचे ग्रहण
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागत आहेत. कोंडीमुळे वाहनांना इच्छितस्थळी जाण्यासाठी बराच विलंब लागतो. त्यामुळे कामाचा खोळंबा होतो. त्यापुढे अंतर्गत मार्गाची दुरवस्था झाल्याने मोठी समस्या समोर उभी राहते, त्यामुळे नागरिक कोंडीत सापडत आहेत.

विरार महामार्गासह शिरसाड, भिवंडी, वज्रेश्वरी मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत; परंतु अद्याप दुरुस्ती करण्यात आली नाही. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांना, तसेच प्रवाशांचा मनस्ताप होत आहे, याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष घालून सुसज्ज रस्ते तयार करावेत.
- मनोज किणी, चांदीप

वसई गोखिवरे, वालीव, सातिवली मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. त्याचा वाहतुकीमुळे मोठा फटका बसत आहे. रुग्ण, वयोवृद्ध व मुलांना प्रवास करणे अवघड होत आहे. महापालिका प्रशासनाने लवकर रस्ते दुरुस्त करावेत, अन्यथा बविआ युवा विकास आघाडी रास्ता रोको करणार आहे.
- अजित भोईर, सचिव, युवा विकास आघाडी, गोखिवरे

पावसाळ्यात रस्त्यांवर अनेक खड्डे पडले आहेत. भुईगाव-निर्मळ मार्गावर मुलांसह प्रवास करताना सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खड्ड्यांत पाणी साचत असल्याने वाहन चालवताना अंदाज येत नाही. प्रशासन ढिम्म असून रस्त्यांची दुरुस्ती करीत नाही.
- मिलिंद परेरा, नागरिक, निर्मळ

वसई-विरार शहरातील रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडले आहेत. याचे सर्वेक्षण करण्यात येत असून पावसाने उघडीप दिल्यावर त्वरित रस्ते दुरुस्त केले जातील. दहीहंडी उत्सवापूर्वी काम पूर्ण केले जाईल.
- संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार महापालिका

प्रमुख मार्गांवर प्रवाशांचे हाल
- मुंबई-अहमदाबाद महामार्ग
- कामण- चिंचोटी मार्ग
- वसई- सातिवली मार्ग
- शिरसाड- वज्रेश्वरी- भिवंडी मार्ग
- विरार पूर्व उड्डाणपूल मार्ग
- वसई- वालीव मार्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com