स्थगनवरून सिनेटमध्ये गदारोळ,

स्थगनवरून सिनेटमध्ये गदारोळ,

Published on

‘स्थगन’वरून सिनेटमध्ये गदारोळ
युवासेनेचा सभात्याग; विद्यापीठाच्या एकाधिकारशाहीचा निषेध
मुंबई, ता. २७ ः मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) बैठकीत स्थगन प्रस्तावासाठी सदस्यांनी दिलेल्या २० पैकी केवळ एकच विषय चर्चेसाठी स्वीकारल्याने पदवीधर, प्राध्यापक आदी सदस्यांनी जोरदार गदारोळ केला. प्रशासनाने आमचे अधिकारच नाकारून बैठकीचे कामकाज रेटून नेत असल्याचा आरोप करीत युवासेनेच्या सदस्यांनी सभात्याग केला.

सिनेट सदस्य धनराज कोहचाडे यांनी स्थगन प्रस्तावावर यापूर्वी अनेक विषय घेण्यात आले; मात्र आता आमचे विषयच घेतले जात नाहीत आणि बोलूही दिले जात नसल्याचे सांगत विद्यापीठ प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच सिनेट सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगत सभात्याग केला. त्यामुळे सिनेट बैठकीत विद्यापीठाकडून सुरू करण्यात आलेल्या दंडेलशाहीचे सभागृहाबाहेरही तीव्र पडसाद उमटले. प्राध्यापक सदस्यांनीही विद्यापीठाच्या एकाधिकारशाहीचा जोरदार निषेध व्यक्त केला.
सिनेट बैठकीत दुपारच्या सत्राची सुरुवात होताच प्रशासन अधिकारी व कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी आपल्याकडे २० स्थगन आले आहेत. त्यातील केवळ एकच स्थगन मांडण्यास परवानगी दिली जाईल, असे सांगत विद्यापीठ कायद्यातील नियम वाचून दाखवले. त्यावर सदस्यांनी जोरदार आक्षेप घेत प्रशासनाला धारेवर धरले. सर्वच प्रस्ताव स्वीकारले जावेत, अशी भूमिका मांडली. शशिकांत धोत्रे यांनी एकच प्रस्ताव घेतल्यास पुढेही असाच पायंडा पडेल, असा इशारा दिला. त्याला प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांनी एकच स्थगन स्वीकारून इतर प्रस्तावांवर चर्चा केली जाईल, असा पर्याय सूचवला, तर कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी सदस्यांना स्थगनऐवजी त्याच विषयांवर चर्चा करा, त्यात सहभागी व्हा, अशी विनंती केली; मात्र त्यावरही सदस्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी सभात्याग केला.
----
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी
मुंबई ः मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासताना बऱ्याच त्रुटी राहिल्या आहेत. त्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. त्यामुळे विद्यापीठाने आम्हाला न्याय द्यावा, या मागणीसाठी आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना आज विद्यापीठ प्रशासनाने पोलिसी बळाचा वापर करून प्रवेशद्वारापासूनच हुसकावून लावले. यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
उत्तरपत्रिका तपासणीत आढळलेल्या त्रुटी दाखवण्यासाठी विद्यार्थी छायांकित प्रत घेऊन कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या भेटीसाठी आले होते. अनेक प्रश्न तपासलेच नसल्याचे विद्यार्थ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले; परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. दरम्या‍न, स‍िनेटमध्येही परीक्षा विभागाचा गोंधळ, पदवी प्रमाणपत्रातील चुका आदी सभागृहात सादर करण्याची मागणीही फेटाळण्यात आली. त्यामुळे युवासेना आणि बुक्टूचे सिनेट सदस्य लवकरच राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेणार असल्याचे युवासेनेच्या सदस्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com