भाजपचे उत्तर भारतीय कार्ड
संदीप पंडित : सकाळ वृत्तसेवा
विरार, ता. २७ : यंदाची वसई-विरार महापालिकेची निवडणूक पालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर स्थानिक पातळीवरील राजकीय गणिते बदलली आहेत. यापूर्वी वसई तालुक्यातील तीनही मतदारसंघांत बहुजन विकास आघाडीचे आमदार होते, परंतु आता या जागा विरोधकांकडे गेल्याने ही निवडणूक बविआची परीक्षा घेणारी ठरणार आहे. आतापर्यंत बविआ सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग या ठिकाणी यशस्वीपणे राबवत आली आहे. त्याला या वेळी भाजप उत्तर भारतीय कार्डने उत्तर देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग यशस्वी होतो की वसई-विरारमध्ये उत्तर भारतीय कार्ड चालते, हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.
वसई-विरार महापालिकेच्या स्थापनेपासून बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता राहिली आहे, परंतु या वेळी निवडणुकीसाठी पक्षाला सत्ता स्थापनेसाठी मेहनत करावी लागणार आहे. वसई तालुक्यात बविआची गेल्या ३५ वर्षांपासून एकहाती सत्ता होती. त्यामुळे पंचायत समिती, जिल्हा परिषद, तत्कालीन नगर परिषद आणि आता महापलिकेत त्यांची सत्ता होती. मात्र विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर बविआचा पराभव झाल्याने पालिका निवडणुकीत त्याचा फटका पक्षाला बसणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे, तर दुसऱ्या बाजूला वसईतील तीनपैकी दोन जागांवर भाजप, तर एका जागेवर शिवसेना निवडून आली आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला मेहनत करावी लागणार आहे.
आतापर्यंत बविआने सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग यशस्वीपणे राबविला होता. त्या जोरावर त्यांनी आपली सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळविले होते. तत्कालीन नगरपालिकेत दक्षिण भारतीय महिला, मुस्लिम, उत्तर भारतीय, गुजराती, आगरी, दलित, ओबीसी नागरिकांना नगराध्यक्ष पदे दिली होती. महापालिकेत ओबीसी, दलित, गुजराती, दाक्षिणात्य नागरिकांना पदे दिली होती. त्यामुळे भाजपचे उत्तर भारतीय कार्ड या ठिकाणी कितपत यशस्वी होते, ते बघण्यासारखे आहे.
नालासोपाऱ्यासाठी प्राधान्य
बहुजन विकास आघाडीने जरी सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग यशस्वीपणे राबवला असला तरी हातात सत्ता आल्यावर निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांमुळेच बविआला विधानसभेच्या निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जात आहे. भाजपने मराठी-हिंदी भाषेच्या वादानंतर उत्तर भारतीय कार्ड खेळण्याची तयारी सुरू केली असून, तसे प्रयत्न आहेत. महापालिका क्षेत्रात सर्वात जास्त प्रभाग हे नालासोपाऱ्यात उत्तर भारतीय मतदार असलेले असल्याने त्या अनुषंगाने निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.