खेळाडूंचे भवितव्य अंधारात

खेळाडूंचे भवितव्य अंधारात
Published on

पनवेल, ता. २८ (बातमीदार)ः सांस्कृतिक, कला, क्रीडा, त्याचबरोबर राजकीय व सामाजिक केंद्र म्हणून कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीची अनेक वर्षे ओळख होती. पनवेल तालुक्यातील अनेक खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांचे धडे घेताना यश मिळवले, मात्र आता अकादमीच्या लिलावाचा निर्णय घेण्यात आल्याने नवोदित खेळाडूंचे भवितव्य अंधारात जाणार आहे.
पनवेल, उरण आणि ठाणे जिल्ह्यातील ९५ गावांमध्ये जमीन संपादित करून नवी मुंबईचा विकास करण्यात आला. या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांसाठी भूखंड राखीव ठेवण्यात आले. अनेक संस्थांना आरक्षित जागा सिडकोने दिल्या. पनवेलचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीलासुद्धा भूखंड देण्यात आला. या ठिकाणी मोठे क्रीडांगण निर्माण करण्यात आले. याकरिता आमदार निधीसुद्धा खर्च करण्यात आला. भव्य दिव्य स्वरूपाचे इनडोअर आणि आऊटडोअर खेळांसाठीची व्यवस्था करण्यात आली. आंतरराष्ट्रीय दर्जाची शूटिंग रेंज त्याचबरोबर स्विमिंग पूल बांधण्यात आला. त्यामुळे अनेक खेळाडूंना प्रशिक्षण मिळाले, पण आता या अकादमीचा लिलाव होणार असल्याने हक्काच्या व्यासपाठीपासून खेळाडू मुकणार आहेत.
--------------------------------
विविध स्पर्धांचे केंद्र
पनवेलच्या खेळाडूंसाठी अकॅडमीमध्ये कर्नाळा कला, क्रीडा महोत्सवसुद्धा भरवण्यात येत होता. वर्षाच्या शेवटी अनेक कलाकार खेळाडू यामध्ये सहभागी होत होते. याशिवाय वर्षभर विविध स्पर्धाही होत होत्या. जागतिक कबड्डी स्पर्धा येथेच भरवण्यात आली. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये नवी मुंबई पोलिस भरतीसुद्धा झाली आहे. अत्यंत भव्य दिव्य असलेले हे क्रीडा संकुल आता स्वतःच्या अस्तित्वाची अखेरची घटका मोजत आहे.
----------------------------------------
लिलावाची कारणे
माजी आमदार विवेक पाटील क्रीडा संकुलाचे सर्वेसर्वा होते. कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या घोटाळाप्रकरणी काही वर्षांपासून कारागृहात आहेत. जवळपास ५०० कोटींच्या ठेवी बँकेमध्ये अडकल्या होत्या. ठेवीदारांना पाच लाखांपर्यंतचा विमा मिळाल्याने ३५ हजार ठेवीदारांना त्यातून त्यांचे पैसे मिळाले, परंतु त्याहून अधिक रक्कम असणाऱ्या ठेवेदार अद्यापही ठेवीपासून वंचित आहेत.
------------------------------------------
शेकापच्या जडणघडणीचा साक्षीदार
कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी कारागृहात असणाऱ्या माजी आमदार विवेक पाटील यांच्या राजकारणातील अंत्यत महत्त्वाची संस्था मानली गेली आहे. शेकापच्या बैठका, मेळावे याच ठिकाणी होत होते. या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रमसुद्धा होत होते. या अकॅडमीमधूनच शेतकरी कामगार पक्षाच्या राजकारणाची सूत्रे हलत होती. विविध राजकीय घडामोडी येथूनच घडत होत्या.
--------------------------------
कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेलकरांची ओळख होती. या ठिकाणी अनेक खेळाडू घडले. त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी निशुल्क पद्धतीने खेळाला प्रोत्साहन आणि प्रेरणा देत होती. या क्रीडा केंद्राचा लिहिला होत असल्याने ही बाब पनवेलकरांसाठी खरोरच दुर्दैवी आहे.
- सुभाष पाटील, आंतरराष्ट्रीय पंच, तायक्वांडो
़़़़़़़़़़़़़़़----------------------------
कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले आहे. जिल्हास्तरीयपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंतच्या सर्व स्पर्धा मी या ठिकाणी खेळलो आहे. माझे या अकॅडमीसोबत भावनिक नाते आहे. स्पोर्ट्स अकॅडमीच्या लिलावाच्या बातम्या वाचतो तेव्हा मन खिन्न होते. भविष्यात आपण या ठिकाणी सराव करू की नाही, याबद्दल साशंकता आहे.
ः- हिमांशू विसाळे, आंतरराष्ट्रीय तायक्वांडो खेळाडू, पनवेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com