वाशी फळ बाजारात आगीचा धोका
वाशी फळ बाजारात आगीचा धोका
बाजार समितीची व्यापाऱ्यांना अग्निरोधक यंत्रणा बसविण्याची सूचना
तुर्भे, ता. २८ (बातमीदार) : आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील घाऊक फळ बाजारात पुन्हा एकदा आगीचा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी अनेकदा लागलेल्या आगींमुळे मोठे वित्तीय नुकसान झाले असूनही बाजारातील गाळ्यांमध्ये आवश्यक ती अग्निरोधक यंत्रणा बसवण्यात आलेली नाही. परिणामी, बाजार समितीच्या वतीने सर्व व्यापारी व अडत्यांना आपल्या गाळ्यांमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसविण्याच्या सूचना पुन्हा एकदा देण्यात आल्या आहेत.
बाजारात लाकडी पेट्या, रद्दी खोके, गवत, पेंढा यांचा मोठा साठा असतो. अनेक व्यापारी गाळ्यात गॅसवर स्वयंपाक करतात. त्यामुळे आग लागण्याची शक्यता वाढते. तर कामगार विडी-सिगारेट ओढून काडी कुठेही फेकतात. यामुळे आग लागते. पूर्वी लागलेल्या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. अग्निशमन दल येईपर्यंत आग भडकत राहते. त्यामुळे तातडीने ती विझवण्यासाठी मार्केटमध्ये यंत्रणाच नाही. त्यामुळे एपीएमसी प्रशासनाकडून मार्केटमधील व्यापाऱ्यांना अग्निरोधक यंत्रणा बसविण्याच्या सूचना केल्या आहेत. यामध्ये प्रत्येक गाळ्यात अग्निशमन यंत्र अनिवार्य असावे, गाळ्यांमध्ये ज्वलनशील वस्तूंचा साठा टाळावा तसेच कामगारांनी वापरणाऱ्या गॅस स्टोव्हचा वापर बाजारात बंद करावा इत्यादींचा समावेश आहे. मात्र मागील घटनांमधून धडा न घेता व्यापारी सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दर सहा महिन्यांनी अशा पत्रव्यवहाराच्या माध्यमातून सूचना दिल्या जातात. प्रत्यक्षात मात्र काहीही अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. दरम्यान, बाजार समितीचे उपसचिव यांनी कडक शब्दांत ही सूचना पत्रव्यवहाराद्वारे व्यापाऱ्यांना दिली आहे. परंतु ही पत्रव्यवहाराची प्रक्रिया केवळ औपचारिकतेपुरती राहते की यावर कारवाई होणार, हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. आगीच्या घटनांमध्ये जीवितहानी टळावी यासाठी व्यापारी आणि बाजार समिती दोघांनीही आता जागरूक होणे अत्यावश्यक आहे.
............
व्यापाऱ्यांचे एपीएमसी प्रशासनावर बोट
बाजारातील व्यापारी मात्र बाजार समितीवरच बोट ठेवत आहेत. अग्निरोधक यंत्रणा बसवणे ही केवळ आमची जबाबदारी नाही, तर बाजार समितीनेच केंद्रीय यंत्रणा बसवावी, असा सूर व्यापाऱ्यांमधून उमटत आहे. गाळे देताना नियम लावणाऱ्या बाजार समितीने सुरक्षाविषयक सुविधा देणेही अपेक्षित असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
..........
प्रशासनाच्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे
प्रत्येक गाळ्यात अग्निशमन यंत्र अनिवार्य
गॅस स्टोव्ह आणि स्वयंपाक बंद करावा
रद्दी पुठ्ठा, पेंढा, बॉक्स यांचा साठा टाळावा
ज्वलनशील पदार्थ गाळ्यांत ठेवू नयेत
.........