थोडक्‍यात बातम्या नवी मुंबई

थोडक्‍यात बातम्या नवी मुंबई

Published on

बेलपाडा सर्कलवर प्रचंड वाहतूक कोंडी
खारघर, ता. २८ (बातमीदार) : बेलपाडा सर्कल परिसरात सोमवारी (ता. २८) सकाळी ९ ते ११ दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या वेळी पोलिस प्रशासनाचे कर्मचारी उपस्‍थित नसल्याने वाहनचालकांसह नागरिकांनी रोष व्‍यक्‍त केला.
भारती विद्यापीठ, उत्सव चौक आणि ए. सी. पाटील कॉलेजच्या दिशेने जाणाऱ्या सर्व मार्गांवर सुमारे एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्त्यावर उभी असलेली अवैध प्रवासी वाहने आणि रस्त्याच्या कडेला वाहने दुरुस्त करणाऱ्या गॅरेज व्यावसायिकांमुळे वाहतूक कोंडीत अधिकची भर पडली. या वाहतूक कोंडीदरम्यान कुठलाही वाहतूक पोलिस घटनास्थळी दिसून आला नाही. त्यामुळे एनएमएमटी बसचे वाहक व काही चालकांनी स्वतः पुढे येऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. खारघर वाहतूक शाखेचे नवीन नियुक्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक दररोज कारवाई करीत असले तरी बेलपाडा सर्कल परिसरात परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. पोलिसांकडून अधिक सतर्कता आणि सातत्याने कारवाई होणे गरजेचे आहे.
..............
पाटील कुटुंबातील महिलांसाठी अष्टविनायक यात्रा
तुर्भे (बातमीदार) : नेरूळ गावातील सामाजिक कार्यकर्ते अक्षय गजानन पाटील यांनी आपल्या कुटुंबातील महिलांसाठी एक आगळीवेगळी भेट देत तीनदिवसीय अष्टविनायक तीर्थयात्रेचे आयोजन केले होते. २५ ते २७ जुलैदरम्यान ही यात्रा पार पडली. यात पाटील कुटुंबातील १७० सदस्य सहभागी झाले होते. या उपक्रमासाठी कुटुंबातील चंद्रकांत पाटील, रत्नाकर पाटील, प्रभाकर पाटील यांच्यासह अनेकांनी मेहनत घेतली. भजनसंध्येने यात्रेला अधिक रंगत दिली. अक्षय पाटील यांनी याआधीही वैष्णोदेवी विमान प्रवासाचे आयोजन केले होते. त्यांनी सांगितले की दरवर्षी कुटुंबासाठी अशी तीर्थयात्रा आयोजित करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
............
महिलांच्या सुरक्षेसाठी दक्षता बैठक
नेरूळ (बातमीदार) : कोपरखैरणे पोलिस ठाण्याच्या वतीने महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत महिला डिफेन्स प्रशिक्षण घेतलेल्या सदस्यांबरोबर चर्चा करण्यात आली. आगामी सण-उत्सव काळात महिलांची सुरक्षा, सार्वजनिक ठिकाणी असुरक्षितता यावर उपाययोजना सुचवण्यात आली. कोपरखैरणेचे पोलिस निरीक्षक औदुंबर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. महिलांना ११२ आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.
.............
सानपाडा पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन रखडले
नेरूळ (बातमीदार) : सानपाडा पोलिस ठाण्याची नवीन सुसज्ज इमारत बांधून पूर्ण झाली असूनही उद्घाटन न झाल्यामुळे ती धूळ खात पडून आहे. जुन्या गळक्या चौक्यांमधून पोलिस कामकाज करीत असून, नागरिकांना व पोलिसांना त्रास सहन करावा लागत आहे. नवीन इमारतीमध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा असूनही उद्घाटनाअभावी रखडपट्टी झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे योगेश शेटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे याबाबत लक्ष वेधले आहे.
...................
शिवसेनेच्या पुढाकाराने स्वच्छता मोहीम
नेरूळ (बातमीदार) : नेरूळ गावात शिवसेनेच्या उपशहर प्रमुख कल्पेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान राबवण्यात आले. वर्षानुवर्षे साचलेला कचरा आणि अडगळीच्या जागा स्वच्छ करण्यात आल्या. ‘खिडकीतून कचरा टाकू नका’ हा संदेश गावपातळीवर पोहोचवण्यात आला. या वेळी गावातील अनेक मंडळींनी सहभाग घेतला होता. या वेळी शिवसेनेच्या वतीने स्‍वच्‍छतेचा संदेश पोहोचविण्यात आला.
.............
सानपाडा येथे शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबिर
तुर्भे (बातमीदार) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सानपाडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सुमारे २५० बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. शिबिरात पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
..................
खारघरमध्ये मालमत्ता कर मार्गदर्शन शिबिर
खारघर (बातमीदार) : पनवेल महापालिकेच्या अभय योजनेअंतर्गत ३० जुलै रोजी मालमत्ता कर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर हाइड पार्क सभागृहात संध्याकाळी ७ ते ९ वाजता होणार आहे. शिबिरानंतर ऑनलाइन आणि धनादेशाद्वारे कर भरणे शक्य होईल, असे सांगण्यात आले आहे.
................
दुकान गाळे वाटपासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
खारघर (बातमीदार) : आदिवासी व स्थानिक भूमिपुत्रांसाठी दुकान गाळे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेच्या वसाहत विभागाने विहित नमुन्यात अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. पालिका अधिकारी जयराम पादीर यांनी शेकापचे तेजस्वी घरत यांना याबाबत अधिकृत पत्र दिले आहे. लवकरात लवकर आदिवासींसह भूमिपुत्रांनी अर्ज सादार करावा, असे सांगण्यात आले आहे.
....................
महिलांसाठी ‘खेळ महाराणी पैठणीचा’ कार्यक्रम
खारघर (बातमीदार) : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त २ ऑगस्ट रोजी ‘खेळ महाराणी पैठणीचा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व सहभागी महिलांना हमखास बक्षीस आणि लकी ड्रॉ विजेत्यांना महाराणी पैठणी भेट दिली जाणार आहे. या वेळी खेळ, गाणी, गप्पा व धमाल कार्यक्रम होणार असून, सहभागी प्रत्येक महिलेस हमखास बक्षीस दिले जाणार आहे. लकी ड्रॉ विजेत्यांना महाराणी पैठणी भेट दिली जाणार आहे. हा कार्यक्रम सेक्टर १२, गणेश मंदिर परिसरात सायंकाळी सहा वाजत सुरू होणार आहे. महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समर्थ महिला मंडळाच्या अध्यक्षा वनिता पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com