शाळेची वाट बनली धोकादायक!
नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. २८ : उल्हासनगर महापालिकेने विकासाच्या नावाखाली राबवलेली ‘रस्ते खोदणी मोहीम’ नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अनेक महिन्यांपासून उल्हासनगरच्या विविध भागांतील रस्ते विविध प्रकल्पांसाठी खोदून ठेवले आहेत. परिणामी, नागरिकांना विशेषतः शाळकरी मुलांना धोकादायक परिस्थितीतून प्रवास करावा लागत आहे. अनेक विद्यार्थ्यांना तोल सावरून निमूळत्या जलवाहिन्यांवरून जावे लागत आहे.
उल्हासनगर महापालिकेचा कथित विकास पॅटर्न पुन्हा एकदा संपूर्णपणे फसवा आणि जनतेच्या जीवाशी खेळणारा ठरत असल्याचे समोर आले आहे. याचे ताजे उदाहरण कॅम्प ३मधील सपना गार्डनजवळील परिसरात घडलेली घटना आहे. सपना गार्डन परिसरात एका खोदलेल्या रस्त्यावर जलवाहिनीवरून शाळेत जाणाऱ्या मुलांचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात लहान मुले असुरक्षित निसरड्या, उघड्या आणि नाल्याचे पाणी वाहणाऱ्या वाहिनीवरून तोल सावरत जात असतात. हा प्रकार पाहून कोणीही हादरून जाईल. कारण अशा प्रकारचा प्रवास ही केवळ बेजबाबदारपणाची नाही, तर जीवाशी खेळणारी व्यवस्था असल्याचे स्पष्ट होते.
ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागत आहे, तो प्रशासनाच्या अपयशाचा आणि बेजबाबदार धोरणाचा थरकाप उडवणारा नमुना आहे. या घटनेनंतरही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी जर दुर्लक्ष केले, तर भविष्यात अधिक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे, हे नक्की.
विकासकामांचे ढोल
महापालिकेच्या अशा बेफिकीर कारभारामुळे जनतेत संतापाची लाट पसरली आहे. या परिसरात पावसाळ्यामुळे रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. पाणी साचल्यामुळे तुटलेल्या वाहिन्या आणि खड्डे लपून जातात. यात अपघाताची शक्यता वाढली आहे. स्थानिक आमदार कुमार आयलानी यांच्या नावाने सतत विकासकामांचे ढोल बडवले जाते. भूमिपूजनांचे भव्य सोहळे, उद्घाटनाचे कार्यक्रम आणि शहरभर झळकणारी बॅनरबाजी यांत लाखो रुपये खर्च केले जातात. प्रत्यक्षात मात्र कामांची पूर्णता दिसत नाही. अनेक ठिकाणी कामे अर्धवट स्थितीत वर्षानुवर्षे अडकून पडलेली आहेत.
फसवेगिरीचा विकास
महापालिकेच्या प्रशासनातील अधिकारी केवळ कागदोपत्री कामे दाखवून आपली जबाबदारी संपली असे समजतात. नागरिकांच्या तक्रारींवर केवळ तोंडदेखली आश्वासने देऊन वेळ मारून नेली जाते. प्रत्यक्ष पाहणी, चौकशी किंवा जबाबदारीचे भान ठेवण्याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर शहरातील ‘विकास’ हा शब्द आता जनतेसाठी एक विनोदाचा विषय बनला आहे. उल्हासनगरमध्ये खरेच विकास झाला का, की केवळ घोषणांचा गाजावाजा झाला, हा प्रश्न प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण झाला आहे.
चौकशीनंतर कार्यवाही
याबाबत जनसंपर्क अधिकारी अजय साबळे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी याबाबत माहिती घेतो तसेच चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.