खड्डे मारुन मंडप आणि कमानी उभारा

खड्डे मारुन मंडप आणि कमानी उभारा

Published on

रस्ते खोदकामाला अभय
नवी मुंबईतील गणेश मंडळांवर मेहेरनजर, पालिकेकडून धोरणाचा अभाव
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २८ ः गणेशोत्सव काळात मंडप आणि जाहिरातींच्या कमानीकरिता शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर गणेशोत्सव मंडळांकडून खड्डे खणले जातात. मुंबई महापालिकेने खड्डे मारणाऱ्या मंडळांवर १५ हजारांच्या दंडाची तरतूद केली आहे. पण नवी मुंबई महापालिकेने कोणतेही धोरण आखले नसल्याने गणेशोत्सव काळात रस्त्यांची चाळण होणार आहे.
महापालिका मुख्यालयात शुक्रवारी (ता. २६) शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीला सुमारे ३०० पेक्षा जास्त गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेतर्फे मंडळांना दिल्या जाणाऱ्या परवानग्या, मुदतीबाबत या वेळी चर्चा झाली. गणेशोत्सव काळात वाहतुकीला त्रास होईल असे मंडप अथवा कमानी उभारू नका, अशा सूचना पोलिसांतर्फे देण्यात आल्या. तसेच महापालिका अधिकाऱ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन केले. या वेळी मंडळांकडून रस्त्यांवर खोदकाम करून उभारण्यात येणाऱ्या कमानी तसेच मंडपाबाबत कोणत्याही प्रकारची नियमावली देण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्याच्या प्रवेशद्वारावर विविध जाहिरातींसाठीच्या बेकायदा कमानी, एलईडी स्क्रीन लावून जाहिरातबाजीसाठी होणाऱ्या खोदकामांकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे.
--------------------------------
कमानींचे प्रमाण अधिक
गणेशोत्सव काळात विनापरवानगी कमानी उभारणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. गेल्या वर्षी १५ गणेशोत्सव मंडळांनी कमानी उभारण्याबाबत परवानगी घेतल्याची माहिती समोर आली आहे. शहरात गणेशोत्सव काळात कमानींचे प्रमाण शेकडोंच्या घरात जाते. या कमानी उभ्या कशा राहतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
----------------------------------
३५०पेक्षा अधिक मंडळे
बेलापूरपासून ते अगदी दिघ्यापर्यंत ३५० पेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि रहिवासी सोसायट्यांमध्ये गणेशोत्सव साजरा होतो. या मंडळांकडून भव्य देखावे आणि श्रींची प्रतिष्ठापना करण्यासाठी अगदी इमारतीच्या दोन मजल्यापर्यंत मंडप उभारले जातात. तसेच मंडपाच्या आत सहा ते आठ फुटांपर्यंत उंचीचा मंच उभारला जातो.
-------------------------------------
दंडाच्या तरतुदीकडे दुर्लक्ष
पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अनेक भागांतील रस्त्यांचे महापालिकेने डांबरीकरण केले आहे. या रस्त्यांवर मंडप उभारण्यासाठीच्या खोदकामामुळे पुन्हा रस्ते खराब होण्यास सुरुवात होते. महापालिकेच्या रस्त्यांवर काम करणाऱ्यांसाठी गॅस कंपन्या आणि फोन कंपन्यांना अनामत ठेव म्हणून ठरावीक रक्कम दंड स्वरूपात भरावी लागते. गणेशोत्सव मंडळांना मात्र अभय दिले आहे.
----------------------------------
विविध जाहिरातदारांच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या उत्पन्नाच्या आधारावर सार्वजनिक मंडळांना गणेशोत्सव साजरा करता येतो. अशा वेळेस रस्त्यावर कमानी उभाराव्या लागतात. त्याकरिता पालिकेची आणि वाहतूक पोलिसांची रीतसर परवानगी घेतली जाते. गणेशोत्सव संपल्यानंतर खड्डे बुजवण्याचे काम संबंधित गणेशोत्सव मंडळांनी करायला हवे.
- संपत शेवाळे, अध्यक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सेक्टर १७
--------------------------------------
धार्मिक उत्सवात नियमांच्या पायमल्लीचे प्रकार नवी मुंबईत दिसतात. विनापरवाना मोठ्या प्रमाणावर जाहिरात फलक लावणे, मंडपासाठी रस्ता खोदणे, बेकायदा वीजजोडणी घेऊन धार्मिक उत्सवाला गालबोट लावण्याचे काम अतिउत्साही मंडळातर्फे होते आहे. धर्मिक उत्सवदेखील नियमाच्या चौकटीतच साजरे होणे गरजेचे आहे.
- सुधीर दाणी, सजग नागरिक मंच, नवी मुंबई
------------------------------------
महापालिकेतर्फे गणेशोत्सव मंडळांना परवानगी देताना रस्ते, वाहतुकीला अडथळा होऊ नये, अशा परिसरात दिली जाते. तसेच रस्त्यांवर खड्डे मारणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून अपेक्षित नाही. तसेच कमानी परवानगीनंतर लावणे अभिप्रेत आहे.
- सोमनाथ पोटरे, उपायुक्त, परिमंडळ -१, नवी मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com