आंबिष्टेवाडी बनावट दस्तावेज जमीन प्रकरण;
अधिकाऱ्यांनी लाटल्या जमिनी!
आंबिष्टेवाडी बनावट दस्तऐवज जमीनप्रकरणी १३ जणांविरोधात सुनावणी
तारापूर, ता. २८ (बातमीदर) : डहाणू तालुक्यातील आंबिष्टेवाडी येथील जमीन बनावट दस्तऐवजांच्या आधारे बेकायदेशीररीत्या हस्तगत केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात वाणगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, १३ जणांविरोधात तहसील न्यायालयात शुक्रवारी (ता. २५) सुनावणी घेण्यात आली. यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी या जमिनी लाटल्याचा आरोप करण्यात येत आहे.
आंबिष्टेवाडी येथील जमीन बनावट दस्तऐवजाच्या प्रकरणाची मंगळवारी (ता. २२) डहाणू तहसीलदारचे सुनील कोळी यांच्या न्यायालयात संक्षिप्त सुनावणीची नोटीस काढण्यात आली. यामध्ये अर्जदार रजनी गणपत भंडारी उर्फ रजनी कमळाकर पाटील व इतर ११ जणांनी दावा सादर केला असून, त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित जमीन मूळत: दिवंगत बारकु मरकड्या भंडारी यांच्या मालकीची आहे, मात्र मिळते-जुळते नाव वापरून बनावट दस्तऐवज तयार करून जमीन बेकायदेशीररीत्या हडपण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. शुक्रवारी (ता. २५) झालेल्या सुनावणीत एकूण १३ जणांना प्रतिवादी म्हणून नामनिर्दिष्ट करण्यात आले आहे. तहसीलदारांनी सर्व संबंधितांना आवश्यक कागदपत्रांसह न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते, काही जण अनुपस्थित राहिल्यास, एकतर्फी निर्णय दिला जाईल, असेही नोटिसीत नमूद करण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आशीष चुनिलाल कुंभार, नितीन विनायक येवले, भावेश गजानन आक्रे या व्यक्ती केवळ नावापुरते खरेदीदार असून, या जमीन खरेदी प्रकरणात खरे मालक काही शासनाचे अधिकारी असून, त्यांनीच बनावट कागदपत्रे तयार करून तिसऱ्या व्यक्तींच्या नावावर जमीन खरेदी केली. त्यामुळे या प्रकरणाचे खरे सूत्रधार कोण, जमीन खरेदीसाठी या अधिकाऱ्यांकडे एवढा पैसा आला कुठून, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, हे अजून अधिकृतपणे जाहीर झाले नसले तरी या प्रकरणातील अधिकाऱ्यांची नावे लवकरच उघडकीस येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
जमीन फसवणूक प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल झाले पाहिजेत. हे प्रकरण मी आगामी अधिवेशनात मांडणार असून, मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर करून कडक कारवाईची मागणी करणार आहे.
- विनोद निकोले, आमदार, डहाणू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.