भक्ती हीच भारतीय परंपरेची ओळख

भक्ती हीच भारतीय परंपरेची ओळख

Published on

भक्ती हीच भारतीय परंपरेची ओळख
पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या पाद्यपूजनाचा भावपूर्ण सोहळा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, २८ : ‘वृंदावन आणि हरिद्वार दुसरीकडे कुठे नाही. येथे असलेल्या शेकडो बासरी वादकांमध्ये गुरूप्रति असलेली भक्ती आणि निष्ठा हीच खरी भारतीय संगीत परंपरेची ओळख आहे,’ अशी भावना ज्येष्ठ बासरी वादक हरिप्रसाद चौरसिया यांनी व्यक्त केली. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ठाण्यातील घाणेकर नाट्यगृहात झालेल्या तेराव्या ‘अर्पण’ बासरी संगीत महोत्सवात पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या पाद्यपूजनाचा भावपूर्ण सोहळा रविवारी (ता. २७) पार पडला.

गुरुकुल प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात पंडित विवेक सोनार यांच्या १७५ शिष्यांनी सामूहिक बासरीवादन सादर केले. पाच वर्षांपासून ते ८० वर्षांपर्यंतच्या वयाच्या शिष्यांचा या वादनात सहभाग होता. विविध रागांवर आधारित हिंदी गाणी, भक्तिगीते आणि भावगीते त्यांनी बासरीवर सादर केली. ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ हे बालगीत प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. कार्यक्रमात राग भीमपलासी, गोरख कल्याण, भूपाली, दुर्गा आणि वृंदावनी सारंग यांसारख्या रागांचे सादरीकरण करण्यात आले. याशिवाय ‘मोगरा फुलला’, ‘अरे अरे ज्ञाना’, ‘रुणुझुणु रे भ्रमरा’, ‘राधा ही बावरी’ आणि ‘बार बार देखो’ यांसारखी लोकप्रिय गीते बासरीवर सादर केली. वाद्यसंगत म्हणून रवि नवले व अथर्व कुलकर्णी यांनी तबल्यावर, सचिन नाखवा यांनी ढोलकवर, तर किरण बेल्हे यांनी कीबोर्डवर साथ केली. समारोपाला पं. विवेक सोनार यांनी राग मियां मल्हार आणि हंसध्वनी सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना प्रफुल्ल आठवले (तबला) आणि प्रताप पाटील (पखवाज) यांनी संगत केली. कार्यक्रमाला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, युनियन बँकेचे व्यवस्थापक राजकुमार, टीजीएसबी बँकेच्या प्रमुख पौर्णिमा रानडे, अपेक्स फिनान्शियलचे अनंत चौधरी, स्वामी आधारवड संस्थेचे वैभव मलबारी आणि टीप टॉप प्लाझाच्या स्मिता शहा उपस्थित होते.

वृंदावन, हरिद्वार ठाण्यातच
पं. चौरसिया यांचे पाद्यपूजन पं. विवेक सोनार आणि त्यांच्या पत्नी कविता सोनार यांनी केले. भावविवश होऊन पंडित चौरसिया म्हणाले, ‘ठाण्यात बासरीच्या गुरू-शिष्य परंपरेचे जे दृढ नाते पाहायला मिळते, ते देशातील अन्य कोणत्याही भागात दिसून येत नाही. त्यामुळेच माझ्यासाठी वृंदावन व हरिद्वार ठाण्यातच आहेत.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com