तीर्थक्षेत्रासह ग्रामीण भाग अंधारात

तीर्थक्षेत्रासह ग्रामीण भाग अंधारात

Published on

वज्रेश्वरी, ता. २८ (बातमीदार) : चार दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, त्याचा मोठा फटका वसई पूर्वसह वज्रेश्वरी, अकलोली, गणेशपुरी आणि परिसरातील ग्रामीण भागाला बसत आहे. सततच्या वादळी वाऱ्यामुळे आणि विजांच्या कडकडाटामुळे खबरदारी म्हणून वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात आहे. मात्र, ही खबरदारी नागरिकांच्या संतापास कारणीभूत ठरत आहे, कारण अनेक भाग अंधारात बुडाले आहेत.

पावसाळ्याआधी वीज यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीस प्राधान्य न दिल्यामुळे ही स्थिती ओढवल्याची नागरिकांची तक्रार आहे. वादळवाऱ्यामुळे अनेक वेळा खांब, वायर तुटतात, परिणामी वीज वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडते. दुरुस्तीच्या कामासाठी अनेक तासांसाठी वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे दैनंदिन कामकाजापासून वंचित राहणाऱ्या नागरिकांना ताटकळत राहावे लागते. पारोळ वीज उपकेंद्राच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. या उपकेंद्रावर अनेक गावांचा भार असून कर्मचारीही कंत्राटी व अल्पअनुभवी असल्यामुळे दुरुस्ती वेळेवर होत नाही. परिणामी, नागरिक तासनतास अंधारात राहतात.

रस्त्यांची वाताहत
पावसाच्या तडाख्यामुळे शिरसाड वज्रेश्वरी रस्ता वाहून गेला आहे. चार दिवसांपासून पावसाने शिरसाड-वज्रेश्वरी या मार्गावरील मांडवी, पारोळ फाटा, शिरवली मेढे,आंबोडे, सायवन, निंबावली, केलठन, भिवाली, गणेशपुरी, अकलोली कुंड येथील रस्त्याची धूळधाण झाली आहे. रस्यावर दिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना प्रवास करताना इच्छितस्थळी जाण्यासाठी या खड्ड्यांमुळे विलंब लागत आहे. अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाकडून दरवर्षी येथे केवळ खडी व माती टाकून तात्पुरता रस्ता बंदिस्त केला जातो. सध्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करून रात्रीच्या वेळेस वाहने चालवावी लागत असल्याचे सध्याचे चित्र दिसून येते.


वीजपुरवठ्याची बिकट स्थिती
* वारंवार खंडित वीजपुरवठा
* पारोळ उपकेंद्रावर अति भार
* कंत्राटी व अल्पअनुभवी कर्मचारी
* दुरुस्तीला विलंब – नागरिक त्रस्त

अंधारात बुडाले भाग
* वज्रेश्वरी
* अकलोली
* गणेशपुरी
* निंबावली
* भिवाली
* शिरवली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com