थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

माणगाव येथे ''आजी-आजोबा दिन'' उत्साहात साजरा
माणगाव (बातमीदार) : माणगाव तालुक्यातील लीड स्कूलमध्ये ‘आजी-आजोबा दिन’ मोठ्या आनंदात आणि आगळ्या-वेगळ्या उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी आजी-आजोबांनी आपल्या नातवंडांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. काहींनी गोष्टी सांगितल्या, तर काहींनी पारंपरिक गाणी, ओव्या गायल्या. या उपक्रमाने पिढ्यांमधील नातेसंबंध अधिक दृढ होण्यास मदत झाली.
शाळेच्या मुख्याध्यापक बसवराज जगाये आणि सेंटर हेड सुनीता गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात शिक्षक आणि शिक्षिकांनी विशेष मेहनत घेतली. विशेषतः सुपर्णा बोर्लीकर, जयश्री पवार, पल्लवी जावरे, तनिषा पांगारे, उर्मिला भोनकर, शीतल म्हस्के, किरण जगाये, मिफजाला पोटे यांचे योगदान उल्लेखनीय होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने “आजी-आजोबा हे नातवंडांचे पहिले गुरु आणि जीवनातील मार्गदर्शक असतात” हा भावनिक संदेश देण्यात आला. पालक दिन आणि शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या उपक्रमाने नात्यांतील प्रेम, संवाद आणि आपुलकीला नवे आयाम दिले. लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि वृद्धांच्या डोळ्यातील आनंदकार्यक्रमाचे खरे यश ठरले.
.............
श्रावणी सोमवारनिमित्त अलिबागमध्ये भाविकांची गर्दी
अलिबाग (वार्ताहर) : श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी अलिबाग तालुक्यातील विविध महादेव मंदिरांत भक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. कनकेश्वर, गोकुळेश्वर आणि काशी विश्वेश्वर मंदिरात भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लावल्या. मंदिर परिसरात बेल, दुर्वा, फुले, नारळ यांची दुकाने उभारली गेली होती, ज्यामुळे परिसरात जत्रेचे स्वरूप आले. काशी विश्वेश्वर हे ऐतिहासिक आणि आंग्रेकालीन मंदिर असून ते शहराच्या मध्यभागी आहे. याठिकाणी नवविवाहित महिलांनी बेल, दुर्वा, दूध आणि तांदूळ अर्पण करत महादेवाची विशेष पूजा केली. पिंडीवर अभिषेक करण्यासाठी भक्तांची लगबग दिसून आली. रांजणखार येथील भुवनेश्वर मंदिरातही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तसेच कर्जत येथील भीमाशंकर, श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर, पेण तालुक्यातील पाटणेश्वर, आणि अलिबागमधील सिध्देश्वर, रामेश्वर या मंदिरांमध्येही श्रावणी सोमवारी दर्शनासाठी मोठा उत्साह दिसून आला. मंदिराबाहेरच्या लांबच लांब रांगांनी श्रद्धेचे दर्शन घडवले. या पार्श्वभूमीवर पोलिस व स्वयंसेवकांनी चोख बंदोबस्त ठेवला.
.......
सुदर्शन केमिकलतर्फे वनसंवर्धन दिन साजरा
रोहा (ता.२९): "एक झाड पुढच्या पिढीसाठी" या प्रेरणादायी सामाजिक संकल्पनेखाली सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड, रोहा आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवली तर्फे दिवाळी येथे वनसंवर्धन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. साईट हेड विवेक गर्ग आणि सीएसआर प्रमुख माधुरी सणस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत रविवारी (ता. २७) एकाच दिवशी तब्बल एक हजार भारतीय प्रजातींच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते झाले. तटकरे यांनी पर्यावरण रक्षणाची गरज अधोरेखित करत वृक्षसंवर्धनाबरोबरच जैवविविधतेचे संरक्षण करण्याचा संदेश दिला.
...............
पेणमध्ये नागपंचमी साजरी
पेण (बातमीदार) : नागपंचमीचा सण पेण तालुक्यात उत्साहात पारंपरिक श्रद्धेने साजरा करण्यात आला. काही घरांमध्ये शाडू किंवा मातीपासून बनवलेल्या नागदेवतेच्या मूर्तींची विधीवत पूजा करण्यात आली. दूर्वा, आघाडा, लाह्या, दूध यांचा नैवेद्य दाखवून पूजा करण्याचा परंपरागत विधी पार पाडण्यात आला. काही भक्तांनी नवनाग स्तोत्राचे पठण केले, तर अनेक ठिकाणी घरच्या पाटांवर रांगोळीच्या सहाय्याने नागोबाची चित्रे काढून पूजन करण्यात आले. विशेष म्हणजे काही ठिकाणी गारुडींनी जिवंत नागोब्याची पूजा करून लोकांची श्रद्धा पूर्ण केली. त्यांच्याबरोबर घराघरांत जाऊन नागदेवतेचे दर्शन घडवले गेले.
................
क्षयरोग रुग्णांसाठी पोषण आहाराचे वाटप
खालापूर (बातमीदार) : क्षयरोग निर्मूलन मोहिमेत सामाजिक जबाबदारीची भूमिका स्‍विकारून इनोव्होसिंथ इंडिया कंपनीने पुढाकार घेतला असून तालुक्यातील १०० क्षयरोग रुग्णांसाठी कोरड्या पोषण आहार किट्सचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात खोपोली नगरपालिका दवाखान्यात सोमवारी आयोजित कार्यक्रमात रुग्णांना सहा महिन्यांसाठी पोषण आहाराची किट्स देण्यात आल्या. यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वयुक्त पदार्थ यांचा समावेश असून रुग्णाच्या शरीरबलासाठी उपयुक्त ठरणार आहेत. या प्रसंगी इनोव्होसिंथ इंडियाचे सुरक्षा अधिकारी गिरीश हारागिरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता वानखेडे, डॉ. अविनाश नाईक, डॉ. प्रियांका वरचाली, क्षयरोग पर्यवेक्षक महेंद्र पिंगळे, समाधान धनवे, योगेश म्हसे, ऋतुजा मेहतर आदी मान्यवर उपस्थित होते.
...........
गागोदे खिंड–आराव रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ४ ऑगस्टला आंदोलन
पेण (बातमीदार) : पेण-खोपोली राज्यमार्गावरील गागोदे खिंड ते आराव दरम्यानचा रस्ता मोठ्या प्रमाणावर उखडला असून, जागोजागी खोल खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या दुरवस्थेबाबत सातत्याने पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतप्त नागरिकांनी ४ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सत्यशोधक सर्वोदय संघटनेचे संदीप रेणुका पाटील यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनाला विक्रम मिनिडोअर संघटनेच्या तालुका अध्यक्ष कल्पेश पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. या मार्गाचे काही वर्षांपूर्वी चांगल्या दर्जाचे डांबरीकरण झाले होते. मात्र सध्या नांदाडी फाटा, हेटवणे कॉलनी, गागोदे खिंड आणि वरसई फाटा ते आराव दरम्यान रस्त्याचे चित्र अत्यंत दयनीय झाले आहे. खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तातडीने या मार्गाची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
..................
घोडवली पुल संरक्षक कठडे नसल्याने प्रवास धोकादायक
खालापूर, ता. २९ (बातमीदार) : तालुक्यातील घोडवली ते डोलवली दरम्यानचा पूल संरक्षक कठड्यांशिवाय धोकादायक बनला आहे. त्‍यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. नुकतीच या पुलावरून एक दुचाकीस्वार वाहून गेल्याची घटना घडल्याने ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हा पूल कर्जत, पळसदरी, डोलवली रेल्वे स्थानकाकडे जाणारा मुख्य मार्ग असल्याने विद्यार्थी, नोकरदार आणि ग्रामस्थ याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने कठडे नसल्यामुळे तो अधिक धोकादायक ठरतो. शनिवारी जितेंद्र पालांडे या युवकाचा अपघात याच पुलावर झाला. ग्रामस्थांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे संरक्षक कठडे बसविण्याची मागणी केली होती. मात्र, निधी अभावाचे कारण पुढे करत प्रशासनाने दुर्लक्ष केले. ही दुर्घटना टळू शकली असती, अशी भावना व्यक्त होत असून ग्रामस्थांनी आता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
.......................
हरिहरेश्वर मंदिरात ‘गुलबुंदी लाडू’ प्रसाद विक्री उपक्रमास प्रारंभ
श्रीवर्धन (बातमीदार): दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथे श्रावणी सोमवारचे औचित्य साधून ‘गुलबुंदी लाडू’ प्रसाद विक्री उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. देवस्थान समितीने याची अधिकृत घोषणा करत भक्तांसाठी हा प्रसाद मंदिर परिसरात उपलब्ध करून दिला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ माजी अध्यक्ष वामन बोडस, विश्वस्त निनाद गुरव, उद्योजिका दया भिडे, सेवेकरी व पुजाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. देवाच्या चरणी प्रसाद अर्पण करून विक्रीस सुरूवात करण्यात आली आहे. हरिहरेश्वर देवस्थान पूर्वीपासून निर्माल्य व्यवस्थापन, अगरबत्ती, जैविक खत निर्मिती यासारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. ‘मातीतून मातीत’ ही त्यांची संकल्पना भक्तांच्या मनाला भावणारी ठरली आहे. याच भावनेतून प्रसाद तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. रत्नागिरीच्या उद्योजिका दया भिडे यांच्या संकल्पनेतून आणि सचिव सिद्धेश पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतला गेला. या उपक्रमामुळे भाविकांना स्थानिक व पवित्र प्रसादाची अनुभूती मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com