
सानपाडा पोलिस स्थानकाच्या नवीन इमारतीची रखडपट्टी
उद्घाटन रखडल्यामुळे जुन्या गळक्या चौक्यांमधून कामकाज सुरू
तुर्भे, ता. २९ (बातमीदार) ः नवी मुंबईतील सानपाडा पोलिस स्थानकासाठी बांधण्यात आलेल्या नव्या आणि सुसज्ज इमारतीचे उद्घाटन दोन ते तीन महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना अद्यापही जुन्या आणि असुरक्षित जागेतून काम करावे लागत आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे पत्र पाठवून त्वरित उद्घाटन करण्याची मागणी केली आहे.
सानपाडा पोलिस स्थानकाच्या नवीन इमारतीचे बांधकाम मोराज सर्कलजवळील सिडकोच्या भूखंडावर करण्यात आले आहे. सुमारे आठ ते दहा कोटी रुपये खर्चून ही इमारत पूर्ण झाली आहे. या इमारतीत स्वागत कक्ष, कर्मचारी विश्रांतीगृह, स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी स्वतंत्र कक्ष, लॉकअप रूम, अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र दालने, बैठकीची सुविधा आणि सुसज्ज पार्किंग व्यवस्था उपलब्ध आहे. इतके असूनही या इमारतीचे उद्घाटन अद्याप न झाल्याने ती बंद अवस्थेत धूळखात पडून आहे. दरम्यान, सध्या सानपाडा सेक्टर आठ येथील हुतात्मा बाबू गेनू मैदानाजवळील जुन्या पत्र्याच्या शेडमधून पोलिस ठाण्याचे कामकाज सुरू आहे. येथे पावसाळ्यात छत गळते, प्रसाधनगृहाची कमतरता असून नागरिकांची तक्रारी घेण्यास पुरेशी जागा नाही. लॉकअपची व्यवस्था नसल्यामुळे आरोपींना एनआरआय पोलिस ठाण्यामध्ये हलवावे लागते, जे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायक आहे.
................
सानपाडा हा खाडीकिनाऱ्याला लागून असलेला संवेदनशील भाग आहे. येथे पोलिस ठाण्याची सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे. नागरिकांचे संरक्षण, आपत्कालीन स्थितीला प्रतिसाद आणि कायदा व सुव्यवस्थेसाठी नव्या पोलिस ठाण्याचा त्वरित वापर होणे गरजेचे आहे. याच कारणास्तव योगेश शेटे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असून, लवकरात लवकर उद्घाटन करून पोलिस व नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्य सरकारने या मागणीची दखल घेत तातडीने उद्घाटन आदेश द्यावेत, अशी अपेक्षा सानपाडा विभागातील नागरिक आणि सामाजिक संस्थांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.