
उरण-करंजा रस्ता काही महिन्यांतच उखडला
चार कोटींचा निधी खर्च; नागरिकांमध्ये संतापाची लाट
उरण, ता. २९ (वार्ताहर) ः सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत नुकतेच तयार करण्यात आलेल्या उरण-करंजा रस्त्याची स्थिती अवघ्या दोन ते तीन महिन्यांतच अत्यंत खराब झाली आहे. रस्त्याची खडी उखडली असून, अनेक ठिकाणी डांबरी थर गेलेले दिसून येत आहेत. या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. चाणजे ग्रामपंचायतीचे सरपंच अजय म्हात्रे यांनी या प्रकाराची तीव्र दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
उरण-करंजा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता. जिल्हा परिषद, सिडको तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात संबंधित रस्त्याच्या दुरुस्तीबाबत गोंधळ होता. अखेर स्थानिक आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांतून सुमारे चार कोटी रुपये निधी मंजूर होऊन डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण असे दोन टप्प्यात काम सुरू झाले, परंतु प्रत्यक्षात कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरुवातीलाच चाणजे गावाजवळील काम निकृष्ट असल्याचे सरपंच अजय म्हात्रे यांनी निदर्शनास आणल्याने त्या भागाचे काम पुन्हा करून घेण्यात आले होते, मात्र आता संपूर्ण मार्गावर खडी बाहेर आली असून, डांबरी थर सरकलेला दिसतो. त्यामुळे फक्त वरवर डांबर घालून काम पूर्ण केल्याचा बनाव तर नाही ना, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत, तर काम सुरू होण्याच्या सुरुवातीलाच पुन्हा बांधकाम करावे लागले आणि आता पुन्हा रस्ता खराब होतोय, यावरून या कामाची गंभीर तपासणी व दोषी ठेकेदारावर कारवाईची मागणी ग्रामस्थ व सरपंच अजय म्हात्रे यांनी केली आहे. निकृष्ट कामांमुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय आणि नागरिकांचे हाल होत असल्याने, रस्ते कामात पारदर्शकता आणि कठोर गुणवत्ता नियंत्रणाची गरज अधोरेखित होत आहे.
............
यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम उपअभियंता नरेश पवार म्हणाले, ठेकेदाराला टेंडरनुसार दोन वर्षे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे रस्ता उखडल्याची माहिती मिळाल्यानंतर ठेकेदाराकडूनच हे दुरुस्तीचे काम करून घेतले जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.