थोडक्यात बातम्या नवी मुंबई
‘नाच गं घुमा’तर्फे पारंपरिक मंगळागौरीचा जल्लोषात कार्यक्रम
पनवेल, ता. २८ : ‘नाच गं घुमा पनवेल’ या महिलावर्गीय सांस्कृतिक संस्थेच्या वतीने श्रावण महिन्याचे स्वागत करत दास मारुती मंदिर, पनवेल येथे मंगळागौरीचा रंगतदार कार्यक्रम पार पडला. पावसाचे हवामान असूनही महिलांनी मोठ्या उत्साहाने उपस्थिती लावली. कार्यक्रमाची सुरुवात एका घरकाम करणाऱ्या महिलेकडून आरती करून करण्यात आली, ही कल्पना उपस्थितांनी विशेष गौरवली. पारंपरिक खेळ, फुगड्या, झिम्मा, उखाणे, प्रश्नमंजुषा, वेशभूषा स्पर्धा यामुळे संपूर्ण वातावरण श्रावणमय झाले होते. ‘श्रावण क्वीन’ स्पर्धा विशेष आकर्षण ठरली. दीपक साडी स्टोअर व वेदा आर्ट यांच्या सौजन्याने आयोजित विविध स्पर्धांमध्ये विजेत्यांना साड्या, नथ, इतर बक्षिसे देण्यात आली. सर्व महिलांना ‘अंकित ज्वेलर्स’ तर्फे भेटवस्तू देण्यात आली. कार्यक्रमाची सांगता स्वादिष्ट अल्पोपहाराने झाली. ‘नाच गं घुमा’ ग्रुपच्या सदस्यांनी उत्कृष्ट आयोजन करत पनवेलमधील महिलांना आनंददायी अनुभव दिला. संस्थेने भविष्यात अशाच उपक्रमांची घोषणा केली आहे.
...............
वंचितकडून खड्डेमय रस्त्यांविरोधात आंदोलन
नेरूळ वार्ताहर : सीवूड्स परिसरात खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे त्रस्त नागरिकांच्या प्रश्नाकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या मुख्यालयासमोर आंदोलन छेडले. अध्यक्ष ॲड. उमेश हातेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आयुक्त कैलास शिंदे यांच्या गाडीसमोर ठिय्या दिला. ‘बाहेर काढा, खड्ड्यातून आम्हाला बाहेर काढा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी आयुक्तांच्या बंगल्यासारखा रस्ता सीवूड्स परिसराला मिळावा, अशी मागणी केली. यावेळी महिला आघाडीच्या साक्षी लोटे, समाजवादी पक्षाचे मिथुन कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला आहे.
..................
नेरूळ मध्ये आरोग्य केंद्राची मागणी
जुईनगर : नेरूळ सेक्टर १० परिसरात आरोग्य केंद्राची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या नेरूळ गावात असलेले केंद्र सकाळी ९ ते २ याच वेळेत सुरू असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. कामावर जाणाऱ्यांना वेळेवर सेवा मिळत नाही, यामुळे स्थानिकांनी आरोग्य वर्धिनी केंद्र स्थापन करण्याची मागणी केली आहे. या परिसरात अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. खासगी उपचार महाग असल्याने सरकारी केंद्रेच पर्याय असतो. मनसे विभाग सचिव अर्जुन चव्हाण यांनी या संदर्भात अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. अण्णासाहेब पाटील उद्यानात हे केंद्र सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
..................
सानपाडा येथे रोजगार मेळावा
तुर्भे : युवासेनेच्या वतीने सानपाडा येथे येत्या ३ ऑगस्ट रोजी रोजगार मेळावा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सानपाडा सेक्टर ८ येथील वात्सल्य ट्रस्टसमोरील पुलाखाली हा कार्यक्रम सकाळी ९ ते दुपारी २ दरम्यान पार पडणार आहे. माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर यांच्या वाढदिवसानिमित्त हे उपक्रम घेतले जात आहेत. या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार असून दहावी, बारावी, आयटीआय, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तसेच अकुशल उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. इच्छुकांनी शिवसेना शाखा सानपाडा येथे अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले. चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक दिले जाणार असून, स्पर्धेचे विषय "निसर्ग", "गावातील सकाळ", "माझी नवी मुंबई", "सामाजिक समस्या" आदी असणार आहेत. ही स्पर्धा ५ वी ते ७ वी तसेच ८ वी ते १० वी या दोन गटांमध्ये घेतली जाणार आहे.
.............
सततधार पावसामुळे छत्री दुरुस्ती व्यवसायाला सुगी
नवीन पनवेल : मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अडगळीत पडलेल्या छत्र्या पुन्हा वापरात येऊ लागल्या आहेत. त्यामुळे छत्री दुरुस्ती व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. जुन्या छत्र्यांची दुरुस्ती, नवीन छत्र्यांची विक्री आणि प्लॅस्टिक चप्पल, बूट यांची देखभाल करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. छत्री दुरुस्त करणारे कारागीर पावसाळ्यात चार महिनेच भरपूर उत्पन्न कमवतात. सध्या २० ते ३० रुपये खर्च करून नागरिक छत्र्या दुरुस्त करत आहेत. काहीजण त्याऐवजी थेट नवीन छत्री विकत घेतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही पनवेल शहर आणि तालुक्यात हा हंगामी व्यवसाय तेजीत आहे.
.............
पाणी टंचाईबात सिडकोविरोधात आंदोलनाचा इशारा
खारघर : खारघर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून तेही वेळेवर मिळत नसल्याची ओरड आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने सहा ऑगस्ट रोजी सिडको कार्यालयावर धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. सिडकोच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, टँकरचे दूषित पाणी मिळत असल्यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आंदोलनात अशोक गिरमकर, प्रवीण कदम, संतोष शेट्टी यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
...................
कामोठे पोलिस ठाणे पनवेल विभागातच ठेवण्याची मागणी
पनवेल : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या नव्या रचनेनुसार कामोठे पोलिस ठाणे खारघर विभागात वर्ग करण्यात आले आहे. मात्र स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार हे पोलिस ठाणे पनवेल विभागातच राहावे, यासाठी शिवसेनेचे स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांनी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांना भेटून लेखी निवेदन दिले आहे. चंद्रशेखर सोमण यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या विकासात दीर्घकालीन योगदान दिले आहे. आयुक्तांनी त्यांच्या मागणीची दखल घेत सह आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सोमण यांनी सर्व पोलिस ठाण्यांसाठी नवीन मोबाईल क्रमांक प्रसिद्ध करण्याची मागणीही केली आहे.
.................
खारघरमध्ये शेकापच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
खारघर : शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने खारघर सेक्टर १२ मध्ये मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उद्योजक संतोष शेट्टी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शेकापमध्ये प्रवेश केला. बाळाराम पाटील म्हणाले की, शेकाप हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. सध्या खारघर, तळोजा परिसरात भीषण पाणीटंचाई असून आमदार प्रशांत ठाकूर याकडे दुर्लक्ष करत आहेत. पालिकेतील ठेकेदारी राजकारण, दुहेरी मालमत्ता कर आणि खड्डेमय रस्ते यावर त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली. आगामी निवडणुकीत नागरिकांनी या सत्ताधाऱ्यांना उत्तर द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.