मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे १२३ रुग्ण लाभार्थी

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे १२३ रुग्ण लाभार्थी
Published on

पालघर, ता. २९ (बातमीदार) : आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरीब किंवा आपत्तीग्रस्त नागरिकांना विविध प्रकारच्या कठीण परिस्थितीत आणि गंभीर वैद्यकीय उपचारांसाठी तातडीने आर्थिक मदत पुरविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही योजना सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामधून पालघर जिल्ह्यातील १२३ रुग्णांना जवळपास एक कोटीची वैद्यकीय मदत करण्यात आली. त्यामुळे या उपक्रमामुळे अनेकांचे प्राण वाचण्यासाठी मदत झाली.

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते. मुख्यमंत्री सहाय्यता निधी जिल्हा कक्षाचा पालघर जिल्ह्यातील कार्याभिमुख दृष्टिकोन, गरजू रुग्णांपर्यंत प्रभावी पोहोच, सामाजिक उपक्रमांचा पुढाकार व निधी व्यवस्थापनातील पारदर्शकता ही बाब संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श ठरत आहे. रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी कार्यरत असलेली ही यंत्रणा-सक्षम व लोकाभिमुख उपक्रम राबवित आहे. पालघर जिल्हा कक्षाच्या माध्यमातून १ जानेवारी ते ३० जून या कालावधीत १२३ रुग्णांना ९८ लाख ५० हजारांची मदत वितरित करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या जिल्हा कक्षामुळे यापुढे रुग्णांना वैद्यकीय मदतीसाठी थेट मंत्रालयात जावे लागणार नाही. या उपक्रमामुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांच्या वेळेची व पैशाची बचत होत असून, उपचारात विलंब होण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. गरजवंत रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेली मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना आता जिल्हा स्तरावर प्रभावीपणे कार्यान्वित होत आहे. या उपक्रमामुळे गरजूंना दिलासा देणारे यश मिळवत आहे, अशी प्रतिक्रिया अनेक लाभार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.

आरोग्य शिबिरांचे आयोजन
पालघर जिल्हा कक्ष केवळ आर्थिक सहाय्यापुरताच मर्यादित न राहता, जनजागृती व सामाजिक बांधिलकी जोपासणारे विविध उपक्रमही राबवित आहे. रक्षाबंधन आणि गणेशोत्सवानिमित्त विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त पाच रक्तदान शिबिरांत ९५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. आषाढी एकादशीदिवशी चरणसेवा व आरोग्य तपासणी या उपक्रमांतर्गत १३३ वारकऱ्यांची तपासणी व ४५ जणांना चरणसेवेचा लाभ मिळाला.

जिल्ह्यातील सेवाभावी संस्थांशी समन्वय
जिल्हा कक्षाने जनतेत जनजागृती व निधी उभारणीसाठी नऊ रुग्णालये व १२ सेवाभावी संस्थांना भेटी दिल्या. या प्रयत्नांतून एक लाक्ष सहा हजारांचा निधी संकलित झाला. राज्य सरकार, रुग्णालये व स्वयंसेवी संस्थांमध्ये समन्वय साधून अधिकाधिक रुग्णांना मदतीचा लाभ मिळवून देण्याचे कार्य सुरू आहे, असे सांगण्यात आले.

सहाय्यता निधीसाठी प्रक्रिया आणि पात्रता
- अर्ज करण्याची सुविधा : www.cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अथवा पालघर जिल्हा कक्ष कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज केल्यास सरकारकडून मदत करण्यात येते.

- आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, रेशन कार्ड, वैद्यकीय अहवाल, उत्पन्नाचा दाखला, खर्चाचा अंदाजपत्रक.

- पात्रता निकष : अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १.६० लाखापेक्षा कमी असावे. सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांना मदत दिली जाते. उपचार पूर्ण झाल्यानंतरचा अर्ज अमान्य केला जातो. अर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित रुग्णालयाच्या बँक खात्यात निधी जमा केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com