मीनाताई ठाकरे रंगायतन सात वर्षांपासून बंद

मीनाताई ठाकरे रंगायतन सात वर्षांपासून बंद

Published on

संजय भोईर : सकाळ वृत्तसेवा
भिवंडी, ता. ३० : शहरातील सांस्कृतिक उपक्रमांचे प्रमुख केंद्र असलेल्या स्व. मीनाताई ठाकरे रंगायतनाच्या रंगमंचाचा पडदा गेले सात वर्षे बंद आहे. नाट्यगृहातील अपघातानंतर सुरक्षेच्या कारणास्तव २०१८मध्ये हे नाट्यगृह बंद करण्यात आले. त्यानंतर सरकारकडून निधी मंजूर आणि ठेकेदार नियुक्त होऊनही कामाचा वेग अत्यंत संथ आहे. आतापर्यंत केवळ २५ टक्केच काम पूर्ण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
१९९६ मध्ये उभारण्यात आलेले हे नाट्यगृह शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. अनेक नाटकांचे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे साक्षीदार राहिले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत झालेल्या दुर्लक्षामुळे या रंगायतनाची अवस्था बिकट झाली. २०१७ मध्ये एका शाळेच्या कार्यक्रमादरम्यान छतावरील पीओपीचा तुकडा कोसळून दुर्घटना होण्याचा प्रकार घडला. त्यानंतर महापालिकेने १९ जानेवारी २०१८ पासून रंगायतन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

निधी मंजूर, पण काम रखडलेच
सुमारे पाच वर्षे बंद अवस्थेत राहिल्यानंतर अखेर २०२३मध्ये तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नाट्यगृह नूतनीकरणासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. उर्वरित खर्च पालिकेकडून उचलण्यात आला. नंतर मेसर्स रामदेव इंटरप्रायझेस या कंपनीला १५ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले. कामाची मुदत एक वर्ष होती. मात्र, तब्बल अडीच वर्षे उलटून गेल्यानंतरही केवळ २५ टक्केच काम झाले आहे. यामध्ये स्थापत्य कामे झाली असली, तरी विद्युत, वातानुकूलन आणि अंतर्गत सजावटीची कामे रखडली आहेत.

कारवाईस टाळाटाळ
विशेष म्हणजे ठेकेदाराने आतापर्यंत दोन कोटी सहा लाख २३ हजार रुपयांचे बिलही पालिकेकडून उचलले आहे. कामात दिरंगाई असूनही ठेकेदारावर प्रत्यक्ष कारवाई टाळली जात आहे. जर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले, तर सरकार पुन्हा निधी देईल का, असा प्रश्‍न पालिका अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केला आहे.

माहिती लपवण्यासाठी पत्र्यांचे आवरण
रंगायतनाच्या सभोवताली पत्रे लावून पूर्णपणे बंदिस्त करण्यात आले आहे. सुरक्षा रक्षक ठेवून बाहेरील व्यक्तींना आत प्रवेश नाकारण्यात येतो. त्यामुळे नेमके किती काम झाले आहे, याची माहिती नाट्यरसिकांना मिळत नाही. परिणामी, शहरवासीयांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अतिक्रमणामुळे प्रवेश मार्ग अडले
नाट्यगृहाभोवती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने प्रवेशद्वार आणि परिसर अरुंद झाला आहे. त्यामुळे नामवंत नाट्यसंस्थांना येथे प्रयोग करणे अवघड बनले आहे. नाट्यप्रेमींच्या मते, अतिक्रमण हटवून परिसर खुला केल्यास रंगायतनाला पुन्हा वैभव मिळू शकते.

लोकप्रतिनिधींची उदासीनता
सत्ताधारी नगरसेवक नसतानाही शहराचे प्रतिनिधित्व करणारे आमदार, खासदार यांनीही या नाट्यगृहाबाबत लक्ष घातले नसल्याची नाराजी शहरातील नाट्यप्रेमींमध्ये आहे. गेल्या सात वर्षांत एकदाही रंगायतन सुरू होईल अशी आशा निर्माण झाली नाही.

नाट्यरसिकांना प्रतीक्षा
स्व.मीनाताई ठाकरे रंगायतन सात ते आठ वर्षांपासून बंद आहे. नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी सरकारने कोट्यवधी रुपये मंजूर केले. भिवंडीतील नाट्यरसिक नाट्यगृह कधी सुरू होणार याची प्रतीक्षा करत आहेत अशी प्रतिक्रिया नाट्यरसिक मीना कुंटे यांनी दिली आहे.

ठेकेदाराने मुदतीत काम पूर्ण करण्याची गरज होती; पण मुदतीच्या काळात फक्त स्थापत्य काम पूर्ण केली आहेत. विद्युत व वातानुकूलित यंत्रणांसह सुशोभीकरणाची कामे शिल्लक आहेत. ठेकेदाराला काम लवकर पूर्ण करण्यासंदर्भात दोन नोटीस बजावल्या आहेत.
- जमील पटेल, शहर अभियंता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com