‘आयुष्मान आरोग्य मंदिर’ की ‘अनारोग्य केंद्र’?

‘आयुष्मान आरोग्य मंदिर’ की ‘अनारोग्य केंद्र’?
Published on

उल्हासनगर, ता. २९ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिकेच्या ‘आयुष्मान आरोग्य मंदिर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरोग्य केंद्रांची पाहणी केली असता प्रत्यक्षात ते ‘अनारोग्य केंद्र’ असल्याचा वास्तवदर्शी निष्कर्ष समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या संयुक्त दौऱ्याने उघड केलेल्या या धक्कादायक स्थितीमुळे शहरातील आरोग्य व्यवस्थेवरील प्रश्नचिन्ह अधिक गडद झाले आहेत. ना सोयीसुविधा, ना योग्य मनुष्यबळ, ना औषधांचा साठा या सगळ्या बाबींसह सरकारच्या निकषांनाही फाटा देत महापालिकेची आरोग्य सेवा केवळ नावापुरती उरली असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.
शहरातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सिटीझन्स केअर फाउंडेशनच्या पुढाकाराने हा पाहणी दौरा केला होता. या दौऱ्यात कायद्याने वागा लोकचळवळीचे राज असरोंडकर, अशोका फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी रगडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील आणि भाजपचे सतीश मराठे सहभागी झाले होते. त्यांनी उल्हासनगरमधील आठ आरोग्य केंद्रांची तपासणी करून ती सरकारच्या आरोग्य सेवांच्या विहित निकषांपासून किती दूर आहेत, हे स्पष्टपणे मांडले. या केंद्रांमध्ये ना योग्य जागा आहे, ना नैसर्गिक प्रकाश, ना वीज व पाणी पुरवठ्याची योग्य सोय. औषधांचा तुटवडा, तपासणी उपकरणांचा अभाव, विविध चाचण्यांची अनुपलब्धता आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचा निकष न पाळल्यामुळे ही केंद्रे नागरिकांसाठी उपयुक्त ठरण्याऐवजी अप्रासंगिक ठरत असल्याचे असरोंडकर यांनी सांगितले. दिव्यांग, वृद्ध आणि महिला रुग्णांच्या सोयींचाही विचार न झाल्याने या सेवा केवळ सरकारी कागदांपुरत्या मर्यादित राहिल्या आहेत.
महापालिकेच्या कोणत्याही आरोग्य केंद्रात सरकारने निर्धारित केलेले निकष पाळले नाहीत. ही आरोग्य केंद्रे सरकारच्या आराखड्याला आणि नागरिकांच्या गरजांना हरताळ फासणारी आहेत, अशी तीव्र प्रतिक्रिया असरोंडकर यांनी दिली. त्यांनी यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून उत्तर मागण्याची भूमिका घेतली आहे. ही पाहणी दौऱ्याच्या माध्यमातून ‘सिटीझन्स केअर फाउंडेशन’ या नव्या मंचाची निर्मिती केली आहे. आरोग्य क्षेत्रातील समस्यांवर सातत्याने लक्ष ठेवत महापालिकेवर दबाव टाकण्याचे काम या फाउंडेशनकडून केले जाणार आहे. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. अन्यथा, सामाजिक संघटना आणि जागरूक नागरिकांच्या आवाजामुळे हा विषय अधिक तीव्र होणार हे निश्चित.

महापालिकेची आरोग्य सेवा म्हणजे केवळ कागदोपत्री दाखवलेलं स्वप्न आहे. ‘आयुष्मान आरोग्य मंदिर’ हे नाव भुलवणारं असलं, तरी वास्तवात ही केंद्रं ‘अनारोग्याचे मंदिर’ वाटतात. नागरिकांचा महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर विश्वासच उरलेला नाही. त्यामुळे आम्ही ‘सिटीझन्स केअर फाउंडेशन’च्या माध्यमातून आता सातत्याने संघर्ष करणार आहोत
- राज असरोंडकर, कायद्याने वागा लोकचळवळ

महापालिकेची आरोग्य व्यवस्था म्हणजे अपुऱ्या सोयी, मनुष्यबळाचा अभाव आणि प्रशासनाची उदासीनता यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे. नागरिकांचे मूलभूत हक्क असलेल्या आरोग्य सुविधांकडे केवळ अनास्थेने पाहिले जात आहे. पाहणी दौऱ्यात सरकारच्या निकषांशी फारकत घेतलेल्या या केंद्रांमुळे सामान्य जनतेला आरोग्यसेवा मिळण्याऐवजी त्रासच सहन करावा लागत आहे. सिटीझन्स केअर फाउंडेशनच्या माध्यमातून ही यंत्रणा सुधारण्यासाठी ठोस लढा उभारणार आहोत.
- ॲड. स्वप्नील पाटील, प्रहार जनशक्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com