वसई विरार महापालिकेच्या आयुक्ताचा काल निरोप समारंभ आणि आज आयुक्त निवस्थानी ईडीची धाड
आयुक्ताच्या निवासस्थानी ईडीचा छापा
वसई-विरार महापालिका हद्दीतील अनधिकृत इमारतीप्रकरणी कारवाई
नालासोपारा, ता. २९ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांचा सोमवारी (ता. २८) महापालिकेत निरोप समारंभ झाल्यानंतर आज सकाळीच आयुक्तांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला. नालासोपाऱ्यामधील ४१ अनधिकृत इमारतीप्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून ईडीकडून ही छापेमारी सुरू आहे.
अनधिकृत इमारतीप्रकरणी यापूर्वी महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक वाय. एस. रेड्डी, वास्तुविशारद, बांधकामाच्या फाइल्स मंजूर करणारे दलाल, नामवंत बांधकाम व्यावसायिक यांच्या घरांवर ईडीने मे आणि जुलैमध्ये छापेमारी केली होती. या कारवाईत आठ कोटी २९ लाख रोख, १२ कोटी ७१ लाखांची मालमत्ता आणि २३ कोटी २५ लाखांचे हिरेजडित सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले होते. त्यातच आज पालिका आयुक्तांच्या घरावरच छापा पडल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
वसई पश्चिमेच्या दीनदयाळनगरमध्ये आयुक्तांचे शासकीय निवासस्थान आहे. या ठिकाणी आयुक्त अनिलकुमार पवार आपल्या पत्नीसह वास्तव्यास आहेत. महापालिका स्थापनेनंतर सर्वाधिक साडेतीन वर्षांचा कार्यकाळ आयुक्त अनिलकुमार पवार यांना मिळाला आहे. १७ जुलैला पवार यांची मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली होती. त्यांच्या ठिकाणी मनोजकुमार सूर्यवंशी यांची आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, बदलीचे आदेश प्राप्त होऊनही पवार हे १२ दिवस ठाण मांडून बसले होते. शेवटी सोमवारी त्यांनी आपला पदभार सोडून सूर्यवंशी यांना दिला. पवार यांचा मोठ्या थाटामाटात महापालिका कर्मचारी, राजकीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी निरोप समारंभ केला. त्यातच आज सकाळी त्यांच्या घरावर ईडीच्या छाप्याने शहरात खळबळ माजली. सकाळी सहा वाजल्यापासून दिवसभर त्यांची आयुक्त निवासस्थानी कसून, चौकशी केली जात आहे.
छाप्यादरम्यान नेमके काय घडले?
सकाळी सात वाजता ईडीचे अधिकारी आयुक्तांच्या निवासस्थानी आले, तेव्हा आयुक्तांनी दार उघडले नाही. ईडी अधिकाऱ्यांनी आपली ओळख दिली, तरीही आयुक्त उघडत नसल्याने शेवटी सव्वाआठच्या सुमारास अधिकाऱ्यांनी दार तोडून आतमध्ये प्रवेश केला. या वेळी घरात पवार यांची पत्नी होती. ईडीचे तीन अधिकारी, एक महिला अधिकारी आणि दोन सशस्त्र पोलिस ईडीच्या पथकात होते. या अर्धा ते पाऊण तासात आयुक्तांनी फोनाफोनी तसेच संशयास्पद कागदपत्रे, रोख रक्कम लपवली असल्याची शंका अधिकाऱ्यांना आल्याची माहिती मिळत आहे.
मुलाचीही चौकशी
आयुक्त पवार यांच्या निवासस्थानासह नाशिक येथील त्यांचे घर आणि त्यांच्यासंबंधी अन्य ११ ठिकाणी एकाचवेळी ईडीने छापेमारी केल्याचे सांगण्यात आले. पाच तासांनंतर ईडीचे अधिकारी त्यांच्या मुलीलाही या निवासस्थानी घेऊन आले. त्यानंतर १ वाजून ४० मिनिटांनी पवार यांची पत्नी आणि मुलीला दोन वाहनांनी आयुक्त निवासस्थानाच्या बाहेर नेण्यात आले. यामध्ये त्यांचे बँक लोकर्स शोधण्यासाठी त्यांना घेऊन गेल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रकरण काय?
नालासोपारामधील डम्पिंग आणि मलनिस्सारणाच्या राखीव जागेवर बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक सीताराम गुप्ता यांनी ४१ अनधिकृत इमारती उभारून जवळपास आठ हजारांपेक्षा जास्त नागरिकांची फसवणूक केली होती. या प्रकरणात उच्य न्यायालयाच्या आदेशानंतर या ४१ इमारतींवर महापालिकेने तोडक कारवाई केली. यामध्ये हजारो नागरिक बेघर झाले. याबाबत ईडीकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.