कॉलम

कॉलम
Published on

करंदीकर महाविद्यालयात २० संगणकांचे दान
बोर्डी (बातमीदार) : डहाणू येथील एस. आर. करंदीकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची गोडी लावण्यासाठी रुपल आणि नितीन पुरोहित या दाम्पत्याने २० संगणकांसह साहित्याचे ‘ज्ञानदिप’ स्वरुपात दान केले. या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाविद्यालयात विशेष सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून पुरोहित दाम्पत्य उपस्थित होते. त्यांच्यासोबत ज्ञान भारती संस्थेचे मानद सचिव चंद्रराज बोथरा, सदस्य आशित बोथरा आदींनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. रुपेश गायकर यांनी भूषविले. गायकर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पुरोहित दांपत्याचे योगदान अनमोल असल्याचे सांगितले. या दानामुळे विद्यार्थ्यांना अद्ययावत संगणकीय सुविधा मिळतील आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला नवे बळ मिळेल, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ऐश्वर्या सावंत यांनी केले.
---
पालघर उपनियंत्रक वैध मापनशास्त्र कार्यालयात जनता दरबार
पालघर (बातमीदार) : अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागांतर्गत कार्यरत वैध मापनशास्त्र यंत्रणेत पारदर्शकता आणणे, लोकसंपर्क दृढ करणे आणि ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेवर निराकरण करण्याच्या उद्देशाने पालघर जिल्हा कार्यालयात दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जनता दरबार आयोजित केला जातो. याच उपक्रमाचा भाग म्हणून ५ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता, प्रशासकीय इमारत ब, कक्ष क्र. ७, पालघर-बोईसर रोड, कोळगाव येथील उपनियंत्रक वैध मापनशास्त्र कार्यालयात जनता दरबार होणार आहे. या दरम्यान ग्राहक, ग्राहक संघटना, पॅकबंद वस्तूंचे उत्पादक, पॅकर, आयातदार, किरकोळ विक्रेते, व्यापारी, तसेच वजन-माप परवानाधारक उत्पादक, दुरुस्तक व विक्रेते यांना आपल्या समस्या, सूचना आणि तक्रारी थेट मांडण्याची संधी मिळणार आहे. वैध मापनशास्त्राशी संबंधित तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व घटकांनी उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपनियंत्रक सी. सा. कदम यांनी केले आहे.
---
जिजाऊ संस्थेच्या वतीने १५ शाळांतील विद्यार्थ्यांना वह्या
विक्रमगड (बातमीदार) : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि शिवसेनेचे उपनेते निलेश सांबरे यांच्या पुढाकारातून विक्रमगड तालुक्यातील १५ जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. डोल्हारी, कुंझै, सुकसाळे, विक्रमगड शहरासह इतर ग्रामपंचायतींतील जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी विक्रमगड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष महेंद्र पाटील, नगरसेवक व जिजाऊ संघटना तालुकाध्यक्ष निकेत पडवळे, कुर्झे ग्रामपंचायतीचे उपसरपंच केतन मेथवाले, सामाजिक कार्यकर्ते शिवराज ठाकरे, त्यांचे सहकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळून शिक्षणास प्रोत्साहन मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
---
डॉ. शहा शाळेची आयआयटी मद्राससोबत शैक्षणिक भागीदारी
विरार (बातमीदार) : चेन्नई येथील आयआयटी मद्रास या संस्थेशी शैक्षणिक भागीदारी करण्याचा मान आगाशी येथील आ. वि. अ. शिक्षण संस्थेच्या डॉ. एन. पी. शहा इंग्रजी माध्यम शाळेला मिळाला आहे. पालघर जिल्ह्यातील इंग्रजी माध्यम शाळांमध्ये आयआयटी मद्रासच्या स्कूल कनेक्ट प्रोग्रॅममध्ये सहभागी होणारी ही पहिली शाळा ठरली आहे. या भागीदारीमुळे दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्कात विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांचा लाभ घेता येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांची माहिती मिळून करिअर निवडीसाठी मार्गदर्शन मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
---
वसईतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ
विरार (बातमीदार) : वसईतील समाज उन्नती मंडळाच्या वतीने गुणीजन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मंडळाच्या सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. टी. बुक बँकेचे प्रवर्तक हसमुखभाई शहा होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये वर्तक कॉलेजचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे, दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे आणि महापालिकेचे माजी महापौर उपस्थित होते. दहावी, बारावी, पदवी आणि पदव्यूत्तर परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हसमुखभाई शहा यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पुस्तकांचे आणि गरीब होतकरू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन करताना सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक अनिल अर्जुन वनमाळी यांनी, तर सूत्रसंचालन प्रकाश रामचंद्र वनमाळी, तर आभार प्रदर्शन माधुरी वालिंजकर यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र वनमाळी, कार्याध्यक्ष धनंजय जाधव आणि माणिकपूर रोहिदास ज्ञाती पंचायतीचे अध्यक्ष चंद्रकांत वनमाळी उपस्थित होते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com