थोडक्यात बातम्या रायगड
आरडीसीएला मिळणार हक्काचे मैदान
पोयनाड (बातमीदार) : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या जिल्ह्यातील खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य सरकारकडून दीर्घ मुदतीसाठी मैदानाची जागा मिळावी, या मागणीस महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ मंत्र्यांना भेटले. या भेटीत मंत्री बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना योग्य जागेचा शोध घेऊन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. यामुळे रायगडमधील होतकरू खेळाडूंना क्रिकेटसाठी हक्काचे मैदान मिळणार आहे. सध्या आरडीसीएने विविध वयोगटांसाठी स्पर्धा व शिबिरे आयोजित केली असली तरी मैदानाअभावी खासगी संस्थांवर अवलंबून राहावे लागत होते. दरम्यान, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने पत्राद्वारे क्रीडांगणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली असून, दीर्घकालीन करारावर जागा उपलब्ध झाल्यास अनेक क्रीडा उपक्रम राबवणे शक्य होईल. ही बाब रायगड जिल्ह्यातील क्रीडा विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार आहे.
.....................
नागपंचमीनिमित्त सर्पमित्रांनी केली जनजागृती
पेण (बातमीदार) : श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी पेण तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. नागदेवतेची पूजा करून श्रद्धेने दूध, साखर, फळे व बेलपत्र अर्पण करण्यात आले. पूजनानंतर नागराजाच्या मूर्तीचे विसर्जन तलावात व भोगावती नदीत करण्यात आले. येथील शाळांमध्ये नागपंचमीनिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. सर्पमित्र योगेंद्र वीरकर, करण सोनावणे आणि ऋत्विक यांनी विद्यार्थ्यांना सर्पांविषयी योग्य माहिती दिली. विषारी व बिनविषारी साप, त्यांचे महत्त्व आणि पूजेमागचे वैज्ञानिक कारण यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सर्पमित्र वीरकर यांनी सापांबाबत पसरलेल्या अंधश्रद्धा व गैरसमज दूर करीत संरक्षण व पर्यावरण यांचे महत्त्व अधोरेखित केले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
............
कर्जत भाजप शहर मंडळाची नव्या नेतृत्वासह कार्यकारिणी जाहीर
कर्जत (बातमीदार) : भारतीय जनता पार्टीच्या कर्जत शहर मंडळाने संघटनात्मक पुनर्रचनेच्या प्रक्रियेत नवे नेतृत्व जाहीर केले आहे. नव्या कार्यकारिणीत ६० सदस्यांचा समावेश असून, अनुभवी आणि नवोदित कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. विविध समाजघटकांना समाविष्ट करीत भाजपने ‘सबका साथ, सबका विकास’ या ध्येयाशी सुसंगत कार्यकारिणी उभी केली आहे. राजेश लाड यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली असून, उपाध्यक्षपदी दिनेश भरकले, शैलेश देशमुख, रजनी गायकवाड (महिला-एससा), नितीन दगडे आदींची निवड झाली आहे. सरचिटणीस वसंत महाडिक व अतुल बडगुजर, तर चिटणीस म्हणून अविनाश केलटकर, मंदार जाधव, मनीषा ढुमणे आदींचा समावेश आहे. कोषाध्यक्षपदी दर्शन ठक्कर यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे या कार्यकारिणीत २० महिलांना प्रतिनिधित्व देण्यात आले असून, पाच महिलांना पदाधिकारी पद देण्यात आले आहे.
.................
महामार्गावरील खड्डे पेव्हर ब्लॉकने भरले
कर्जत (बातमीदार) : कर्जत शहरालगत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील श्रीराम व रेल्वे पुलावरील धोकादायक खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. अपघात, वाहतूक कोंडी व नागरिकांचा रोष दिवसेंदिवस वाढत होता. प्रशासनाकडून तात्पुरती कामे केली जात असतानाच भाजप कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी पुढाकार घेत पेव्हर ब्लॉकने हे खड्डे भरले आहेत.
या कामामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला असून, वाहतुकीची कोंडीही कमी झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीही अशाच प्रकारे खड्डे भरल्यानंतर ते बराच काळ टिकले होते. या कामात भाजप शहर मंडळाचे अध्यक्ष राजेश लाड, शैलेश देशमुख, अभिजित पटेल, प्रवीण बोराडे आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
..................
जिल्हा रुग्णालयातील असुविधांवर शेकापचे निवेदन
अलिबाग (वार्ताहर) : अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील असुविधांमुळे रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिसरातील खड्डे, अपुरी स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा अभाव, निकृष्ट बांधकाम आणि बंद पडलेली यंत्रणा या समस्यांचा शेकापच्या वैद्यकीय सेवा सेलचे अध्यक्ष सागर पेरेकर यांनी निषेध केला आहे. त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे निवेदन देत रुग्णालय प्रशासनाने त्वरित सुधारणा कराव्यात, अशी मागणी केली आहे. सध्या सीटीस्कॅन सेवा बंद असून, रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. यामुळे आर्थिक ताण पडत आहे. याशिवाय कोविड काळात बांधलेले शौचालयही बंद झाले असून, रुग्णांच्या नातेवाइकांना याचा त्रास होतो आहे. रुग्णालयात कोट्यवधी रुपयांची कामे करूनही स्लॅब कोसळत असल्याने जीवितास धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
..........
केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे ग्रामस्थ त्रस्त
पोलादपूर (बातमीदार) : पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक येथील साई भवानी नगर भागातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून दूषित व रासायनिक पाण्यामुळे त्रस्त आहेत. येथील विहिरी आणि बोअरवेलमधून येणारे पाणी आरोग्यास घातक ठरत असून, नागरिकांमधून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. या समस्येबाबत ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी दीप्ती घाट यांना निवेदन दिले आहे. भूजलातील रासायनिक प्रदूषणामुळे त्वचा विकार, पोटदुखी, वांती, अपचन यांसारख्या आजारांची लागण होत असल्याची माहिती देण्यात आली. प्रदूषण नियंत्रण मंडळाने पूर्वी नमुने तपासले असले तरी पाण्याची गुणवत्ता सुधारलेली नाही. ग्रामस्थांनी शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. गटविकास अधिकारी घाट यांनी नमुने पुन्हा तपासण्यासाठी पाठवण्याचे आश्वासन दिले आहे. पर्यायी जलस्रोत तयार करणे, टँकरद्वारे स्वच्छ पाणी पुरवणे यासाठीही योजना राबवण्याचे त्यांनी सांगितले. ही समस्या केवळ आरोग्याची नसून मानवाधिकारांची आहे. प्रशासनाने याकडे प्राधान्याने लक्ष घालणे गरजेचे आहे. जलप्रदूषणामुळे होणाऱ्या त्रासाला अखेर पूर्णविराम मिळावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
..............
मुरूड आगारातून अक्कलकोटसाठी विशेष बससेवा
मुरूड (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील मुरूड आगाराने श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोटसाठी विशेष बससेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे शेतकरी, महिला व वृद्ध भाविकांसाठी प्रवास अधिक सुलभ होणार आहे. ही बस ३० जुलै २०२५ रोजी मुरूड येथून सकाळी ९ वाजता अक्कलकोटसाठी रवाना होईल. त्याच दिवशी अक्कलकोटहून परतीचा प्रवासही सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. या बसचे मार्गक्रमण मुरूड-अलिबाग-लोणावळा-स्वारगेट-सोलापूर-अक्कलकोट असा असेल. यामुळे विविध जिल्ह्यांतील भाविकांना देवदर्शनासाठी सुविधा मिळणार आहे. याशिवाय भीमाशंकरसाठीही दररविवारी नियमित बससेवा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे आगार व्यवस्थापकांनी सांगितले. ही सेवा नोंदणी व आरक्षणासाठी खुली असून, इच्छुक प्रवाशांनी आगारातील संपर्क क्रमांकांवर फोन करून माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुरूड एसटी आगाराने भाविकांसाठी उपयुक्त सेवा देत सामाजिक जबाबदारी पार पाडली असून, भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.