नेरळमध्ये पाण्याविना नागरिकांची वणवण;
नेरळमध्ये पाण्याविना नागरिकांची वणवण;
ग्रामपंचायतीच्या अकार्यक्षमतेवर संतप्त प्रतिक्रिया
कर्जत, ता. ३० (बातमीदार) ः नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक सध्या गंभीर पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णतः बंद असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकावे लागत आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या अकार्यक्षमता, नियोजनशून्यता आणि वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडिततेमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.
नेरळ ग्रामपंचायतीअंतर्गत मागील काही वर्षांपासून लोकसंख्येत कमालीची वाढ झाली आहे, मात्र त्यादृष्टीने योग्य पाणीपुरवठा होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील अनेक महिन्यांपासून अचानक पाणीपुरवठा बंद होत असल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. गावात पाणीपुरवठा करणाऱ्या मोटारी विजेच्या माध्यमातून कार्यरत असतात, मात्र मागील काही दिवसांपासून महावितरणकडून वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे मोटारी चालू ठेवता येत नाहीत. यामुळे जलसाठ्यांमधून पाणी टाक्यांपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया पूर्णतः ठप्प झाल्याचे संबंधितांकडून सांगण्यात येत आहे, तर २८ जुलै रोजी संतप्त नागरिकांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयात धडक दिली आणि आपला संताप व्यक्त केला, मात्र त्या वेळी प्रशासक आणि ग्रामसेवक अनुपस्थित असल्याने नागरिकांचा राेष शिगेला पोहोचला. स्थानिक रहिवासी उमेश भागीत यांच्यासह अनेकांनी यापूर्वीही तक्रारी केल्या होत्या, मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला.
............
कचरा व्यवस्थापनासह वाहतुकीचीही दयनीय अवस्था
नेरळमधील केवळ पाणीटंचाईच नव्हे, तर इतर नागरी सुविधादेखील कोलमडल्या आहेत. रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचले असून, त्याची नियमित विल्हेवाट लावली जात नाही. पावसामुळे हा कचरा कुजून दुर्गंधी व रोगराई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय गावात वाहतुकीचा प्रश्नही गंभीर बनला आहे. काही रिक्षा व टॅक्सीचालक भरधाव वेगात वाहने चालवत असून, त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे.
................
राजकीय व सामाजिक स्तरावर निष्क्रियता
या गंभीर परिस्थितीवर कुठलेही ठोस राजकीय किंवा सामाजिक नेतृत्व पुढे येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गावात इतकी मोठी पाणीटंचाई असताना स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा संघटना निष्क्रिय का आहेत, असा सवाल केला जात आहे. नागरिकांनी लवकरात लवकर पाणीपुरवठा आणि इतर नागरी सुविधा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
......
महावितरणकडून सतत वीज खंडित होत होती. त्यामुळे मोटारी बंद ठेवाव्या लागल्या आणि त्यातच वायरिंगमधील बिघाडामुळे गोंधळ निर्माण झाला. सध्या वायरिंगची दुरुस्ती करण्यात आली असून, विजेचा पुरवठा नियमित झाल्यावर योग्य दाबाने पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल.
- सुजित धनगर, प्रशासक, नेरळ ग्रामपंचायत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.