जनतेच्या प्रश्नांसाठी शेकाप कायम लढणार

जनतेच्या प्रश्नांसाठी शेकाप कायम लढणार
Published on

जनतेच्या हक्कांसाठी शेकापचा आक्रमक लढा कायम
प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांचे प्रतिपादन
अलिबाग, ता. ३० (वार्ताहर) ः राज्याच्या सध्याच्या राजकारणात सामान्य जनतेचे प्रश्न दुर्लक्षित होत चालले आहेत. रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न, खराब रस्ते, आणि तरुणांचे भविष्य या सारख्या महत्त्वाच्या विषयांकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष नसून, ते हनी ट्रॅप, ऑनलाइन जुगार यामध्ये गुंतले आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य सोशल मीडियाच्या प्रमुख आणि प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केली. त्या अलिबाग येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
शेकापच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त शेतकरी भवन येथे २८ जुलै रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी तालुका चिटणीस सुरेश घरत, प्रफुल्ल पाटील, अवधूत पाटील, विक्रांत वार्डे, वेदांत कंटक यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, शेकापने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात भरीव योगदान दिले. आज मराठी भाषेवरच अतिक्रमण होत आहे. अशा स्थितीत शेकाप आपली भूमिका अधिक ठामपणे मांडणार आहे. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, आगामी २ ऑगस्टला होणाऱ्या शेकाप वर्धापन दिन मेळाव्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यांनी सरकारवर निशाणा साधताना सांगितले की, निवडणुकीत रोजगाराचे गाजर दाखवून तरुणांची थट्टा केली जाते. अनेक तरुण आजही नोकऱ्यांपासून वंचित आहेत. स्थानिक तरुण बेरोजगार आहेत. आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचलेले तरुण सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. नव्या प्रकल्पांचे स्वागत असले तरी स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य मिळालेच पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा झळकणारच, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. जनतेच्या हक्कांसाठी शेकाप आक्रमक राहणार असून, आगामी काळात रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यासही आम्ही तयार आहोत, असे प्रतिपादन त्यांनी शेवटी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com