बिघडलेल्या वेळापत्रकाने प्रवासी रडकुंडीला

बिघडलेल्या वेळापत्रकाने प्रवासी रडकुंडीला

Published on

बिघडलेल्या वेळापत्रकाने प्रवासी रडकुंडीला
डोंबिवली स्थानकातील गर्दीचे व्हिडिओ व्हायरल
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३० ः मध्य रेल्वेचे रोजच वेळापत्रक बिघडत असल्याने लोकल प्रवासी अक्षरश: त्रस्त झाले आहेत. त्यातच बुधवारी (ता. ३०) सकाळी रेल्वेचे वेळापत्रक बिघडल्याने डोंबिवली स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली होती. या गर्दीचे फोटो समाजमाध्यमांत व्हायरल झाले आहेत. त्यासोबत एका तरुणाने समाजमाध्यमावर लिहिलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. रोज ट्रेनने प्रवास करताना कसे हाल होतात, किती वेळ लागतो आणि मग आपल्यावर रोज रडायचीच वेळ कशी येते, हे या तरुणाने पोस्टमध्ये म्हटले आहे. या तरुणाची पोस्ट सर्वांना आपलीशी वाटत असल्याने नागरिक ती व्हायरल करीत आहेत. तर मनसे नेते राजू पाटील यांनीदेखील या गर्दीवरून पोस्ट करीत राज्य सरकार केंद्रावर जबाबदारी ढकलत असल्याने त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

डोंबिवलीमधील एका तरुणाची समाजमाध्यमावरील पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. त्यात बुधवारी सकाळी बदलापूरजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने रेल्वेसेवा खोळंबली. परिणामी, लोकलच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम झाल्याने लोकल उशिराने धावत होत्या. यामुळे कल्याण, डोंबिवली स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळल्याचे चित्र सकाळी पाहायला मिळाले. या गर्दीचे फोटो समाजमाध्यमातून नागरिकांनी व्हायरल केले. मनसेचे नेते तथा कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांनीदेखील पोस्ट केली आहे.

राज्य सरकारला रेल्वे म्हणजे केंद्र सरकारची जबाबदारी वाटते. फार एखादी दुर्घटना झाली, की पाच लाखांचा धनादेश घेऊन सत्ताधारी कॅमेऱ्यासहित तयारही असतात; मात्र कोणालाही मुंबईकडे जाणाऱ्या या चाकरमान्यांच्या रोजच्या व्यथा दिसत नाहीत, अशी टीका राजू पाटील यांनी केली. निव्वळ टक्केवारी काढण्यासाठी पटापट होणारे मोठमोठे प्रकल्प हाती घेण्यापेक्षा मुंबई लोकलचे महाराष्ट्राचे स्वायत्त रेल्वे बोर्ड स्थापन करून लोकल सेवा कशी सुधारता येईल, यासाठी एक योजना हाती घेणे आवश्यक आहे. उत्तरेकडून येणाऱ्या व उत्तरेकडे जाणाऱ्या काही बिनकामाच्या मेल-एक्स्प्रेस मुंबईबाहेरून सोडल्यास लोकलच्या अधिक फेऱ्या वाढवता येतील. वंदे भारतला दिलेली प्राथमिकता या गोंधळात अधिक भर टाकत आहे, अशाही तक्रारी प्रवासी करीत आहेत. या लोकलने प्रवास करणारे चाकरमनी मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, त्यांची काळजी सरकारने घ्यायलाच हवी. आपण ज्या मुंबईच्या जीवावर देशभरात नंबर एकची जी टीमकी वाजवतो त्या मुंबईला संपन्न करण्यासाठी आपले जीव रोजच धोक्यात घालणाऱ्या प्रवाशांची जबाबदारी ही राज्य सरकारची पण आहे, असेही पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

तरुणाची पोस्ट व्हायरल
हा तरुण पोस्टमध्ये म्हणतो, माझे ऑफिस नवी मुंबईत आहे. मी डोंबिवलीत राहतो. मला रोज ऑफिसला लोकलने पोहोचण्यासाठी दीड ते दोन तास लागतात. परत यायलाही तितकाच वेळ लागतो. दोन तास प्रवास आणि नऊ तास ऑफिसचे काम. यानंतर सगळा उत्साहच संपतो. माझ्यातील त्राणच निघून गेलेला असतो. रोज मनात येते आज नोकरी सोडावी; मात्र सद्यस्थितीत मी नोकरी सोडू शकत नाही, कारण दुसरी कुठलीही ऑफर माझ्याकडे नाही; पण या आयुष्याचा आणि लोकल प्रवासाचा मला कंटाळा आला आहे.

आयुष्य प्रवासात जात आहे
मी रोज ट्रेनचा प्रवास करून रडकुंडीला येतो आहे. मला जिममध्ये जायला, पुस्तकं वाचायला किंवा माझ्या मनाप्रमाणे काही करायला वेळच उरत नाही. दिवसातील बारा तास जर ऑफिस आणि प्रवासात जाणार असतील तर मी काय करावं? मी घरी आलो की जेवण करतो आणि झोपतो. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी ऑफिसला पळतो. हेच चक्र चालले आहे. मला या सगळ्याचा भयंकर कंटाळा आला आहे, अशी पोस्ट डोंबिवलीकर तरुणाने लिहिली आहे. या तरुणाची पोस्ट अनेकांनी लाइक केली आहे. शिवाय सोशल मीडियावर त्याची चर्चाही रंगली आहे. मुंबईत काम करायचे असेल तर इतका प्रवास करावाच लागतो. तुझे तरी तीन तास प्रवासात जातात माझे तर पाच तास जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com