केमिकल झोन ते आयटी हब

केमिकल झोन ते आयटी हब

Published on

केमिकल झोन ते आयटी हब
नवी मुंबईचा आधुनिक कायापालट; मूलभूत सुविधांचा विकास
नवी मुंबई, ता. ३ (बातमीदार) : एकेकाळी केवळ औद्योगिक प्रकल्पांसाठी प्रसिद्ध असलेला टीटीसी (ठाणे ट्रान्स बेल्ट) औद्योगिक पट्टा आज झपाट्याने आधुनिक नागरी वसाहतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. शासनाच्या धोरणात्मक निर्णयामुळे आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीमुळे हा परिसर केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही लक्षवेधी ठरत आहे. यामुळे येथे केवळ औद्योगिक विकास नव्हे, तर नागरिकांच्या राहणीमानातही मोठा बदल घडून येत आहे.
पूर्वी या भागात रसायन उद्योगांचे प्राबल्य होते; मात्र प्रदूषण, युनियन समस्या आणि आर्थिक मंदीमुळे या कंपन्यांचे इतर राज्यांत स्थलांतर झाले. यामुळे रिकाम्या झालेल्या जागांवर आता आयटी, डेटा सेंटर, माईंडस्पेस, आयकिआय, रिलायन्स यांसारख्या आधुनिक कंपन्या उभ्या राहत आहेत. परिणामी, रोजगारनिर्मितीच्या संधीही वाढल्या आहेत. शासनाच्या नवीन धोरणानुसार या औद्योगिक क्षेत्रात ६० टक्‍के जागा आयटी पार्कसाठी आणि उर्वरित ४० टक्के नागरी वसाहतीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
आज या औद्योगिक भागांमध्ये केवळ कंपन्याच नव्हे तर नागरिकांसाठी राहण्यासाठी टोलेजंग इमारती, मॉल्स, हॉटेल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सही उभे राहत आहेत. उदाहरणार्थ, घणसोलीतील ऑरम सिटी, ऐरोलीतील नॉलेज पार्क सिटी यांसारखे प्रकल्प हे याचे ठळक उदाहरण आहेत. यामुळे कामगारांसाठी त्यांच्या कार्यस्थळीच निवास, खरेदी आणि मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
पालिका आणि एमआयडीसीकडून रस्ते, गटारे, मलनिस्सारण आणि पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधा नव्याने विकसित करण्यात येत आहेत. यामुळे औद्योगिक कंपन्यांनादेखील दिलासा मिळाला असून, नव्या गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळत आहे. विशेष म्हणजे, आयटी कंपन्यांमधून आणि नव्या वसाहतीमधून पालिकेला मालमत्ता कराच्या माध्यमातून पूर्वीपेक्षा अधिक उत्पन्न मिळत आहे.
...............
चौकट
नागरी जीवनशैलीचा केंद्रबिंदू
आयटी पार्क धोरणाअंतर्गत कंपन्यांच्या जागेतील ४० टक्के भागात नागरी वसाहती उभारता येत असल्याने, कर्मचाऱ्यांसाठी निवास सुविधा, मॉल्स, हॉटेल्स आणि मनोरंजनाच्या सुविधा निर्माण होत आहेत. यामुळे टीटीसी औद्योगिक क्षेत्राचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलत आहे. एकंदरीत, नवी मुंबईचा हा औद्योगिक भाग हळूहळू केवळ व्यवसायिक नव्हे, तर आधुनिक नागरी जीवनशैलीचा केंद्रबिंदू म्हणून विकसित होत असून, येत्या काही वर्षांत तो देशातील प्रमुख ‘मॉडर्न मिक्स-यूज डेव्हलपमेंट झोन’ म्हणून उदयास येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com