दिव्यांग साहित्य खरेदीत लाखोंचा अपहार?

दिव्यांग साहित्य खरेदीत लाखोंचा अपहार?

Published on

उल्हासनगर, ता. ३० (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिकेच्या दिव्यांग कल्याण विभागात झालेल्या साहित्य खरेदीतील गंभीर अनियमितता समोर आली आहे. बाजारभावाच्या तुलनेत अनेक पट अधिक दराने झालेली खरेदी, अस्तित्वात नसलेल्या कंत्राटदाराकडून काम करवून घेतल्याचे प्रकार उघड झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाने मंगळवारी (ता. २९) महापालिकेवर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारावर जोरदार टीका केली.
माहिती अधिकारातून प्राप्त दस्तावेजांनुसार, २०२२-२३ या आर्थिक वर्षात महापालिकेने ५४ स्मार्ट स्टिक्स प्रत्येकी १२,९०० दराने (एकूण ६.९६ लाख) आणि ८४ सामान्य छड्या प्रत्येकी ८,२०० दराने (एकूण ६.८८ लाख) खरेदी केल्या. मात्र, या साहित्यांचा बाजारभाव अनुक्रमे १५०० ते तीन हजार रुपये आणि ३०० ते ४०० रुपये असल्याने ही खरेदी संशयास्पद ठरली आहे. ही खरेदी मेसर्स स्वामी इंटरप्रायझेस या कंत्राटदाराकडून करण्यात आली होती. मात्र, कंपनीचा दिलेला पत्ता फसवा असल्याचे समोर आले. यापूर्वी या प्रकरणात महापालिकेने अंतर्गत सुनावणी घेत तक्रारदार गैरहजर असल्याचे दाखवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.
प्रहार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग बांधवांसह मंगळवारी आंदोलन करण्यात आले. सुरक्षारक्षकांनी फक्त चार जणांनाच सुनावणीत प्रवेश दिल्याने गोंधळ उडाला. अखेर प्रशासनाने माघार घेत सर्व दिव्यांगांना सुनावणीत सहभागी होऊ दिले. या प्रकरणात पुणे येथील दिव्यांग कल्याण विभागाचे तत्कालीन आयुक्त प्रवीण पुरी यांनी सप्टेंबर २०२४ मध्येच चौकशीचे आदेश दिले होते; मात्र अद्याप कारवाई झाली नाही. दिव्यांगांच्या निधीचा अपहार ही गंभीर बाब असून, दोषींवर कठोर कारवाई होते की नाही, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

१२ दिवसांत चौकशी अहवाल
सुनावणी सहाय्यक आयुक्त सलोनी निवकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यांनी १२ दिवसांत चौकशी अहवाल आयुक्तांकडे सादर करण्याचे आश्वासन दिले. स्वप्नील पाटील यांनी, कारवाई झाली नाही, तर १५ ऑगस्टला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. तर सामाजिक कार्यकर्ते राज असरोंडकर यांनी आयुक्तांविरोधात आरोपपत्र सादर करण्याची घोषणा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com