तासाभरात सोळा लाखांची करवसुली

तासाभरात सोळा लाखांची करवसुली

Published on

खारघर, ता. ३१ (बातमीदार) : पनवेल महापालिकेने मालमत्ता करासाठी शास्तीमध्ये अभय योजना लागू केली आहे. १८ जुलैपासून ते २० सप्टेंबर कालावधीत मालमत्ता कर भरणाऱ्यांना सूट दिली आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, खारघर सेक्टर ३० ते ३५मधील मालमत्ताधारकांकडून पालिकेने एका तासांत १६ लाखांची करवसुली केली आहे.
खारघर तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशन आणि पनवेल पालिकेच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. ३०) मालमत्ता मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. खारघर सेक्टर ३० ते ४० तसेच तळोजा वसाहतीत वास्तव्य करणाऱ्या काही मालमत्ताधारकांच्या मालमत्ता नावात झालेला किरकोळ बदल, मोबाईल नंबर अपडेट, देयक दुरुस्ती आणि मालमत्ता करवसुलीसंदर्भात शंका असल्यामुळे हाईड पार्क सोसायटीच्या सभागृहात सायंकाळी ७ ते ९ या वेळेत मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या वेळी मालमत्ता विभागाचे उपायुक्त स्वरूप खार्गे, अधीक्षक सुनील भोईर उपस्थित होते. त्यांनी मालमत्ताधारकांना अभय योजनेची माहिती देऊन शंका निरसन केले. त्यामुळे मालमत्ताधारकांनी ऑनलाइन आणि धनादेशाद्वारे मालमत्ता कराचा भरणा केला. खारघर तळोजा वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी मंगेश रानवडे, ज्योती नाडकर्णी, मुनाफ अमिराली तसेच पालिकेचे कर्मचारी सत्यम राऊळकर, रोहन येवले, प्रज्वल जावरकर उपस्थित होते.
----------------------------------
तळोजावासीयांचे हेलपाटे
पनवेल महापालिकेने मालमत्ता कर भरणा करण्यासाठी लागू केलेल्या अभय योजनेला मालमत्ताधारकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र तळोजावासीयांना मालमत्ता कर भरण्यासाठी खारघरवरून नावडे असे हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यात धनादेश स्वीकारल्यावर कर देयक पावती घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी बोलावले जात आहे. त्यामुळे नावडे कार्यालय गाठण्यासाठी २०० ते ३०० रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत असल्याने संतापाचे वातावरण आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com