लग्न संस्काराचे इव्हेंटमध्ये झालेले रूपांतर चिंतेचे
लग्न संस्कारात चुकीच्या प्रथा
डोंबिवलीत परिसंवादात दिखाव्याच्या प्रकारावरून तज्ज्ञांची चिंता
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३१ : दोन कुटुंबे जोडणारा लग्न हा एक पवित्र सोहळा आहे. या सोहळ्याचे अलीकडच्या काळात इव्हेंटमध्ये झालेले रूपांतर खूप चिंताजनक आहे, असे मते डोंबिवली महिला महासंघातर्फे गणेश मंदिरातील सभागृहात आयोजित केलेल्या परिसंवादात विविध क्षेत्रांतील जाणकारांनी व्यक्त केली.
पूर्वीच्या काळात लग्न जुळवताना, पार पाडताना नेहमीचे रीतीरिवाज केले जात होते. काही वेळा दोन्हीकडील कुटुंबीयांनी मुलगी आणि तिच्यासोबत श्रीफळाचा स्वीकार करून मुलगी पदरात घेतली आहे. इतके सामंजस्य यापूर्वी दाखविले जात होते. या सगळ्या मुळाशी घरातून होणारा नैतिकमूल्यांचा संस्कार खूप महत्त्वाचा आहे. आताही हा संस्कार आहे. पण आता समाजमाध्यमांमुळे प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करण्याची सवय समाजाला लागली आहे. या गर्तेत लग्नसोहळेही अडकले आहेत, अशी चिंता या वेळी जाणकारांनी व्यक्त केली.
लग्न आणि इतर धार्मिक कार्यात शिरलेल्या अनिष्ट प्रथा रोखायच्या असतील तर पालकांनी पहिल्यांदा आपल्या मुलांमध्ये नैतिक मूल्यांचे रोपण करणे खूप गरजेचे आहे. हा संस्कार प्रभावीपणे तगून राहिला तर नक्कीच लग्नामधील उधळपट्टी करणाच्या अनिष्ट प्रथा बंद होतील, असा निष्कर्ष या वेळी काढला. लग्न झाल्यानंतर पती, पत्नी आपला संसार करतात. अशा वेळी मुलीच्या आईने संसारात आपला वाढता हस्तक्षेप ठेवला तर संसाराचे गणित बिघडते, हा हस्तक्षेप विवाहानंतर कमी होणे आवश्यक आहे.
मोबाईचा अतिवापर घटस्फोटास कारणीभूत
समाजातील आमचे स्थान काय, असा विचार करून काही कुटुंबे बडेजावपणा करीत विवाह सोहळे करतात. या स्पर्धेत लग्नसंस्कार पूर्णपणे विरून जातो. हे समाजासाठी घातक आहे. मोबाईल हा हल्ली घटस्फोटाचे मोठे कारण ठरत आहे. एक साधन म्हणून मोबाईल ठीक, पण त्याचा अलीकडच्या काळातील अतिरेकी वापर पती-पत्नीमध्ये वितुष्ट निर्माण करण्यास कारणीभूत असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले. परिसंवादात सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे, आगरी समाज प्रबोधन संस्थेचे सचिव काळू कोमस्कर, डोंबिवली महिला महासंघाच्या सनदी लेखापाल जयश्री कर्वे, प्रा. विंदा भुस्कुटे, ॲड. मीनल इनामदार, वैद्य वैष्णवी जोशी, समुपदेशक समता डहाणूकर, महिला तक्रार निवारण कक्षाच्या समुपदेशक ॲड. सीमा कुलकर्णी, स्मिता बागवे आदी मान्यवर सहभागी झाले होते.
हुंड्यासाठी छळ
लग्नाच्या वेळी केलेल्या अवाजवी मागण्या पूर्ण झाल्या नाहीत की लग्नानंतर त्या पूर्ततेसाठी विवाहितेचा छळ केला जातो. त्यामधून हागवणे कुटुंबीयांसारख्या घटना घडतात. याचा समाजाने विचार करणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाला ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली परिसरातील विविध क्षेत्रांतील नागरिक उपस्थित होते. कायदेशीर सल्लागार ॲड. पूजा ढोक या वेळी उपस्थित होत्या. सुनीती रायकर, सई बने, ॲड. तृप्ती पाटील, संगीता पाखले, पूजा तोतला, लीना मॅथ्यू यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रयत्न केले. नेत्रा फडके यांनी सूत्रसंचालन केले.