एसएसटीच्या विद्यार्थ्यांचे ''रेड रन मॅरेथॉन स्पर्धेत यश
एसएसटीच्या विद्यार्थ्यांचे रेड रन मॅरेथॉन स्पर्धेत यश
कल्याण, ता. ३१ (वार्ताहर) : आंतरराष्ट्रीय युवादिनानिमित्ताने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रेड रन मॅरेथॉन स्पर्धेत एसएसटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (मुंबई), जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग (ठाणे), जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे आणि गोवेली, कल्याण येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत एसएसटी महाविद्यालयाच्या हरिओम सिंह याने मुलांच्या गटात प्रथम क्रमांक, तर विशाल कनोजिया याने द्वितीय क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात सुजाता मुंढेकर हिने प्रथम क्रमांक आणि अंकिता पोळ हिने द्वितीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. या सर्व विजेत्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने ही एक गौरवाची बाब ठरली आहे. विजेत्यांना अनुक्रमे दोन हजार रुपये (प्रथम), दीड हजार रुपये (द्वितीय) आणि एक हजार रुपये (तृतीय) रोख रक्कम, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. या यशामध्ये विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन करणारे क्रीडा संचालक प्रा. राहुल अकुल आणि प्रा. पुष्कर पवार यांचे मोलाचे योगदान लाभले. या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ. पुरस्वानी, समन्वयक डॉ. खुशबू पुरस्वानी, तसेच सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.