उधाणाने गणपती विसर्जन रॅम्प ची दुरावस्था
उधाणाने श्रीवर्धनचा गणपती विसर्जन रॅम्प धोकादायक!
कोट्यवधींच्या निधी पाण्यात; दुरुस्ती करण्याची मागणी
श्रीवर्धन, ता. ३१ (वार्ताहर) : श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर उभारण्यात आलेल्या गणपती विसर्जन रॅम्पची अवस्था सध्या अत्यंत दयनीय बनली आहे. सुमारे १२ वर्षांपूर्वी तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते समुद्र धूप प्रतिबंधक बंधारा व किनाऱ्याच्या सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा पार पडला होता. त्याच वेळी मठाचा गवंड आणि दांडा विभागात गणेश मूर्ती विसर्जनासाठी रॅम्प उभारण्यात आला होता. परंतु मागील काही दिवसांपासून आलेल्या समुद्राच्या उधाणामुळे मठाचा गवंड येथील रॅम्पची अक्षरशः दुरवस्था झाली आहे.
विशेष म्हणजे, डिसेंबर २०२३ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्रीवर्धन किनाऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यातील सुशोभीकरणाचे लोकार्पण झाल्यानंतर या रॅम्पचे नूतनीकरण करण्यात आले होते. कोट्यवधींचा निधी खर्च करूनही या कामात दर्जाहीनता दिसून येत आहे. उधाणामुळे रॅम्पखालील दगड वाहून गेले असून स्लॅब कोसळला आहे, त्यामुळे लोखंडी सळ्या उघड्या झाल्या आहेत. अशा स्थितीत रॅम्पवर उभे राहून सेल्फी काढणाऱ्या पर्यटकांचे जीवही धोक्यात येण्याची शक्यता आहे. येत्या नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर, श्रीवर्धन किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर भाविक गर्दी करतात. समुद्राला नारळ अर्पण करण्याची परंपरा लक्षात घेता, नागरिकांनी रॅम्पची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
.............
चौकट :
धार्मिक परंपरेला धोका
मठाचा गवंड परिसरात हिंदू स्मशानभूमी आहे. येथे अंत्यसंस्काराआधी मृतदेहाला समुद्रस्नान घालण्याची परंपरा आहे. यासाठी याच रॅम्पचा वापर केला जातो. सध्याची रॅम्पची स्थिती पाहता, या धार्मिक परंपरेवरही मर्यादा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे केवळ उत्सव नव्हे, तर संस्कृती आणि परंपराही धोक्यात आल्या आहेत.