गागोदे खिंड ते आराव मार्गावर खड्डे
गागोदे खिंड ते आराव मार्गावर खड्डे
वंचितसह विक्रम मिनीडोर संघटनेकडून आंदोलनाचा इशारा
पेण, ता. ३० (वार्ताहर) : पेण-खोपोली रस्त्यावरील गागोदे खिंड ते आरावदरम्यान पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह स्थानिकांची मोठी गैरसोय होत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांनी ४ ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा दिला असून, या आंदोलनाला आता वंचित बहुजन आघाडी, विक्रम मिनीडोर संघटना आणि इतर सामाजिक संस्थांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे.
एकेकाळी पेण-खोपोली मार्गाची अवस्था खड्ड्यांनी भरलेली होती. मागील काही वर्षांत हा रस्ता चौपदरीकरण व डांबरीकरण करून सुधारण्यात आला, असला तरी गागोदे खिंड भागातील वन विभागाच्या परवानग्या न मिळाल्यामुळे हा रस्ता तसाच खड्डेमय राहिला आहे. परिणामी, वाहनचालक आणि प्रवाशांना या भागातून प्रवास करताना सतत अपघाताचा धोका पत्करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शाळकरी विद्यार्थी, अपात्कालीन रुग्णवाहिका, रोज कामासाठी जाणारे कर्मचारी यांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी रस्त्यात खोल खड्डे पडल्यामुळे वाहने उलटण्याचे प्रकारही घडले आहेत. याबाबत स्थानिक रहिवासी संदीप पाटील यांनी सांगितले की, सरकारी यंत्रणेकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यावाचून पर्याय नाही. त्यांच्याच सुरात सूर मिसळत वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुनील धामणकर म्हणाले, एखाद्या सामान्य नागरिकाला जर रस्त्याच्या डागडुजीसाठी आंदोलन करावे लागत असेल, तर ही अत्यंत खेदजनक बाब आहे.