थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

शेकाप पुरस्कृत दहीहंडी सोहळ्यात लाखोंच्या बक्षिसांची लयलूट
अलिबाग (वार्ताहर) : अलिबागमध्ये शनिवारी (ता.१६) ऑगस्टमध्ये शेकाप पुरस्कृत भव्य दहीहंडी सोहळा पार पडणार आहे. यामध्ये पुरुष आणि महिला गोविंदा पथकांसाठी लाखोंच्या बक्षिसांची लयलूट होणार आहे. गोपाळकाळा सणाच्या निमित्ताने शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग आणि प्रशांत नाईक मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी भवन येथे हा रंगतदार सोहळा साजरा होणार आहे. पुरुष गोविंदा पथकासाठी प्रथम क्रमांकाचे रोख बक्षीस १,३१,१११ रुपये आणि चषक देण्यात येणार आहे. पाच थरांची सलामी देणाऱ्या पथकाला पाच हजार तर सहा थरांसाठी ११ हजार रुपयांचे बक्षीस आहे. महिला पथकासाठी प्रथम क्रमांकाला ५१, १११ रुपये व चषक, तसेच चार व पाच थरांसाठी अनुक्रमे पाच हजार आणि ११ हजार रुपयांचे बक्षीस निश्चित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, माजी नगराध्यक्षा स्व. अ‍ॅड. नमिता नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शहरातील पुरुष पथकासाठी अतिरिक्त १ लाख रुपये, तर महिला पथकासाठी ५० हजार रुपयांचे खास बक्षीस ठेवण्यात आले आहे. हा उत्सव केवळ स्पर्धेपुरता मर्यादित नसून, सामाजिक एकतेचे प्रतीक ठरणार आहे, असे आयोजक प्रदीप नाईक यांनी सांगितले.
...............
शहीद निलेश तुणतुणे यांना अभिवादन
अलिबाग (वार्ताहर) : कारगिल युद्धात वीरमरण आलेल्या शहीद निलेश तुणतुणे यांच्या २७व्या स्मृतिदिनानिमित्त सहाणगोठी येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शहीद निलेश तुणतुणे ट्रस्ट आणि अलिबाग पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने पार पडणार आहे. कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी, जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल, निवृत्त ले. कर्नल राहूल माने, अ‍ॅड. आस्वाद पाटील, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रम पाटील, पोलिस निरीक्षक किशोर साळे, निवृत्त लष्कर अधिकारी कर्नल एन. डी. जानकर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात पुष्पचक्र अर्पण व पोलिस सलामीने होणार असून, शाळकरी विद्यार्थी लेझीम, वाद्यवृंद आणि देशभक्तिपर गीतांद्वारे शहीद सैनिकांना मानवंदना देतील. विविध शाळांमधून सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण कार्यक्रमाला विशेष रंगत येणार आहे. हा कार्यक्रम तरुण पिढीसाठी देशसेवेचे महत्त्व समजावणारा आणि प्रेरणादायी ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
....................
एस.एस. निकम विद्यालयात सुरक्षा प्रबोधन सत्र
माणगाव (वार्ताहर) : माणगाव येथील एस.एस. निकम माध्यमिक विद्यालय, लोणेरे येथे स्टुडंट पोलिस कॅडेट (एसपीसी) कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विशेष सुरक्षा जागरूकता सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात रस्ते सुरक्षा, महिला सुरक्षा, सायबर गुन्हे, आपत्ती व्यवस्थापन, डायल ११२ व १०८ सेवा यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व पोलिस निरीक्षक भुजबळ यांनी केले. त्यांच्या सोबत महाड ट्रॅफिक विभागाच्या सहाय्यक निरीक्षक लाड, पीएसआय महाडिक (गोरेगाव युनिट) आणि पोलिस कॉन्स्टेबल अमोल दळवी यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून सुरक्षिततेच्या गोष्टी विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापक चावरेकर, उपप्राचार्य खाडे तसेच शिक्षकवर्ग सहभागी होता. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतल्यामुळे सत्र यशस्वी झाले. कायद्याची जाण, शिस्त आणि सामाजिक भान निर्माण करणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याचे शिक्षकांनी सांगितले.
...................
अंजुमन इस्लाम डिग्री कॉलेजमध्ये नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत
मुरुड-जंजिरा (वार्ताहर) : अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, मुरूड-जंजिरा येथे नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औपचारिक स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात शिस्त, गुणवत्ता व सह अस्तित्वाचे मूल्य विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. डॉ. शेख यांनी आपल्या भाषणात शैक्षणिक कारकिर्दीतील संधी, शिस्तीचे महत्त्व, आणि रॅगिंगविरोधी नियम यावर भर दिला. महाविद्यालयात रॅगिंगला कायद्याने बंदी असून त्यासाठी कठोर कारवाईची तरतूद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वरिष्ठ विद्यार्थ्यांनी नवोदितांसाठी विविध खेळ, मनोरंजन कार्यक्रम, महाविद्यालयाच्या वैशिष्ट्यांची माहिती आणि अल्पोपहाराचे आयोजन केले. त्यामुळे नव्या विद्यार्थ्यांनी नवीन वातावरणाशी आत्मीयता निर्माण केली. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. बिस्माह किल्लेदार यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. सूत्रसंचालन हफशा उलडे व सानिया मलेकर यांनी केले.
................
माणगावमध्ये भव्य आरोग्य तपासणी शिबीर
माणगाव (वार्ताहर) : माणगाव येथे अमरदीप ट्रस्ट आणि हेल्थ प्रमोशन ट्रस्‍ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला तब्बल ३५० हून अधिक आदिवासी आणि ग्रामीण नागरिकांनी सहभाग घेतला. मुंबईस्थित कॅथोलिक मेडिकल आऊटरीच संस्थेच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले. शिबिरात अस्थिरोगतज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, पॅथॉलॉजिस्ट तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य विषयातील तज्ज्ञ उपस्थित होते. सुरुवातीला २५० लाभार्थ्यांची नोंद अपेक्षित होती. मात्र, नागरिकांचा प्रतिसाद पाहता ही संख्या लवकरच ओलांडली गेली. डॉ. चेरिल डिसोझा, सिस्टर असुंता पाटील यांच्यासह वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तपासणी, औषधोपचार आणि आरोग्य मार्गदर्शन दिले. शिबिराचे प्रमुख समन्वयक फादर रॉकी बान्झ आणि फादर थॉमस यांच्या टीमने उत्कृष्ट संयोजन केले. रोहा, तळा, महाड आणि माणगाव येथील समन्वयकांनी मोलाची भूमिका बजावली. शिस्तबद्ध व कार्यक्षमतेने पार पडलेल्या या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com