श्रावणात आरोग्यदायी आहाराची पर्वणी
श्रावणात आरोग्यदायी आहाराची पर्वणी
उपवासाच्या काळात रानभाज्यांना मागणी
पेण, ता. ३१ (वार्ताहर) : हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र मानला जाणारा श्रावण महिना सध्या संपूर्ण राज्यात भक्तिभावाने साजरा होत आहे. या महिन्याची सुरुवात होताच उपवास, धार्मिक विधी, व्रते आणि मंदिरांना होणारी गर्दी यामुळे संपूर्ण वातावरण आध्यात्मिकतेने भारावून गेले आहे. याच काळात शरीर सुदृढ राहावे, म्हणून खास आहार घेतला जातो. त्यामुळे विशेष करून रानभाज्यांना चांगली मागणी असते. पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्यातही श्रावणाचा उत्साह दिसून येत आहे.
या महिन्यातील उपवास आणि सात्विक आहारामुळे शरीर आणि मन शुद्ध राहते. उपवास करणाऱ्या व्यक्तींच्या आहारात रानभाज्या, पालेभाज्या, फळे, दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश असतो. त्यामुळे या काळात भेंडी, वांगी, शिराळी, माठ, मेथी, मुळा, दुधी या भाज्यांना मागणी असते, तर राजगिरा, शेंगदाणे, साबुदाणा, पनीर, ताक, लस्सी यांसारख्या पदार्थांमुळे पोषणमूल्ये वाढतात. आंबा, केळी, सफरचंद, जांभूळ, रताळे, द्राक्षे यांसारखी फळे उपवासात लोकप्रिय आहेत. पेण तालुक्यात डोंगराळ भागात आदिवासी व स्थानिक शेतकरी रानभाज्या पिकवतात. त्यामुळे गावठी भाजी बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. श्रावणात याच भाज्यांना विशेष मागणी असते, त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळतो.
....................
नवचैतन्याचा अनुभव देणारा महिना
श्रावण सोमवार आणि शनिवार हे शिवभक्तांसाठी खास दिवस असतात. पेण तालुक्यातील श्री पाटणेश्वर, गोटेश्वर, व्याघ्रेश्वर, धायरेश्वर आणि रामेश्वर मंदिरांमध्ये भाविक पहाटेपासून बेलपत्र वाहण्यासाठी गर्दी करतात. दूग्धाभिषेक, मंत्रजप, नवस बोलणे व पूजाअर्चा यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय होतो. श्रद्धा, आरोग्य आणि भक्ती यांचा संगम असलेला श्रावण महिना अनेक महिलांसाठी आणि कुटुंबांसाठी नवचैतन्याचा अनुभव देणारा ठरतो.
..................
श्रावण महिन्यात उपवास करतानाच पालेभाज्या आणि विविध गावठी पदार्थ खाल्ल्याने आरोग्य टिकून राहते. रोजच्या जेवणात वेगवेगळे पदार्थ तयार होत असल्याने मन प्रसन्न होते.
- पुनम पाटील, गृहिणी