थोडक्‍यात नवी मुंबई

थोडक्‍यात नवी मुंबई

Published on

ढाकणे परिवाराचा सानपाड्यात सन्मान सोहळा
सानपाडा (बातमीदार) : सानपाडा सेक्टर ७ येथील सीताराम मास्तर उद्यानामध्ये सकाळी नियमित चालण्यास व व्यायामास येणाऱ्या बाबासाहेब ढाकणे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा भव्य सन्मान सोहळा बुधवारी (ता. ३०) पार पडला. ढाकणे यांचे पोलिस खात्यातील योगदान लक्षात घेता त्यांना पोलिस महासंचालक पदक प्रदान करण्यात आले आहे. याचबरोबर त्यांच्या मुलाचीही पदोन्नती पोलिस उपनिरीक्षकपदी झाल्याची गौरवास्पद माहिती या प्रसंगी देण्यात आली. ढाकणे कुटुंबीयाच्या यशस्वी वाटचालीचा गौरव करण्यासाठी मैदानातील सहकारी मारुती विश्वासराव यांच्या पुढाकाराने आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत कौतुक समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला शिवसेना विभागप्रमुख अजय पवार, माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, उपजिल्हा प्रमुख मिलिंद सूर्यराव यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढाकणे कुटुंबीयांचा हा गौरव समाजाला प्रेरणादायी ठरत आहे.
....................
जुईनगरमध्ये पुनर्विकास मार्गदर्शन शिबिर
जुईनगर (बातमीदार) : सध्या नवी मुंबईत पुनर्विकासाची मोठी चर्चा सुरू असून या पार्श्वभूमीवर जुईनगरमधील रहिवासी गृहनिर्माण संस्थांसाठी एक विशेष मार्गदर्शन शिबिर शनिवार, २ ऑगस्ट रोजी गावदेवी समाज मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या शिबिराचे आयोजन महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. या शिबिरात ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ, वास्तुविशारद आणि पुनर्विकास विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून रमेश प्रभू (अध्यक्ष, महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशन), माजी नायमूर्ती सुबोध सोनोने, अ‍ॅड. श्रीप्रसाद परब, नवी मुंबई सहकारी हाऊसिंग फेडरेशनचे सचिव भास्कर म्हात्रे, वास्तुविशारद सोपान प्रभू यांचा समावेश आहे. पुनर्विकास प्रक्रियेत सहभाग घेताना रहिवाशांना कोणते अधिकार आहेत, कशा प्रकारे अधिक क्षेत्रफळ मिळवता येते, स्वयं पुनर्विकास म्हणजे काय, या सर्व बाबींची स्पष्ट व सखोल माहिती या शिबिरात दिली जाणार आहे. विविध शंका व अडचणींसाठी तज्ज्ञ थेट उत्तर देतील. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक आणि महापालिकेचे प्रभाग सदस्य विजय साळे यांनी केले आहे.
...........
ऐरोलीत अण्णा भाऊ साठे यांना व्याख्यानातून अभिवादन
वाशी (बातमीदार) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ऐरोली सेक्टर १५ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात "विचारवेध" व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. १ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे सहा वाजता होणाऱ्या या विशेष व्याख्यानात साहित्यिक डॉ. रणधीर शिंदे सहभागी होणार आहेत. डॉ. शिंदे हे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात मराठी विभागप्रमुख असून अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे समन्वयक देखील आहेत. "सामाजिक क्रांती आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे" या विषयावर ते अभ्यासपूर्ण विचार मांडतील. त्यांच्या विचारांमधून अण्णा भाऊंच्या जीवनकार्याचे मोल आणि समाजप्रबोधनाची दिशा उलगडून दाखवली जाणार आहे. कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. लोकशाहीरांच्या साहित्याचा जागर घडवून त्यांना वैचारिक अभिवादन करण्याची ही एक अनोखी संधी आहे.
...........
ऐरोलीमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई
वाशी, ता. ३१ (बातमीदार) : ऐरोली सेक्टर ४ येथील पी-१०० क्रमांकाच्या घरात अनधिकृत बांधकाम केल्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने संबंधितांवर कारवाई केली. दिगंबर वाघमारे आणि अजय बनकर यांनी महापालिकेची परवानगी न घेता हे बांधकाम केल्याचे निदर्शनास आले. महापालिकेने यापूर्वी नोटीस बजावूनही बांधकाम थांबवले गेले नाही. त्यामुळे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या सूचनेनुसार व अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी संबंधितांकडून ५०,००० रुपये दंडदेखील वसूल करण्यात आला. या कारवाईत १० मजूर, २ ब्रेकर मशीन, गॅसकटर व अतिक्रमण विभागाचे पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले होते. सहायक आयुक्त सुनील काठोळे यांच्या नेतृत्वाखाली ही धडक मोहीम राबवण्यात आली.
.................
‘मनभावन श्रावण’ कवीसंमेलनाने रंगणार साहित्यरसिकांचा श्रावण
नेरुळ (बातमीदार) : ‘नवरंग साहित्य, संस्कृती आणि कला मंडळ, नवी मुंबई’ या संस्थेच्या वतीने श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर "मनभावन श्रावण" या विशेष कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन शनिवार, २ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता आग्रोळी येथील बी. टी. रणदिवे ग्रंथालयात होणार आहे. श्रावणातील निसर्ग सौंदर्य, रिमझिम पाऊस, सृष्टीची रंगसंगती, धबधबे, हिरवेगार डोंगर आणि फुलपाखरांची दुनिया या सर्व विषयांवर मराठी कवी आपल्या कविता सादर करतील. निसर्गाचा आनंद आणि भावनांचा वर्षाव अनुभवण्यासाठी ही एक अपूर्व संधी आहे.
साहित्यप्रेमी, नवोदित कवी आणि रसिकांसाठी ही एक साहित्यिक मेजवानी ठरणार आहे. अधिक माहितीसाठी गज आनन म्हात्रे (९३२३१७२६१४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
............
खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धा
खारघर (बातमीदार) : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने ३ ऑगस्ट, रविवार रोजी प्रि-इंटर स्कूल बास्केटबॉल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. खारघर सेक्टर १९ येथील प्लॉट नंबर ५९ वर ही स्पर्धा पार पडणार असून, या स्पर्धेत १४ व १७ वयोगटातील मुले आणि मुलींचे संघ सहभाग घेणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील (उपाध्यक्ष, महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन), माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, स्टेट बॉक्सिंग प्लेअर सिद्धेश टावरी, आणि पॅराडाईज ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर मनीष भतीजा हे उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेच्या आयोजनामागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण करणे व बास्केटबॉलसारख्या खेळासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. स्पर्धेचे आयोजन खारघर स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष किरण पाटील व माजी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.
..................
सुनील सावर्डेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती
खारघर (बातमीदार) : खारघरचे रहिवासी आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेले सुनील सावर्डेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षाचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. सावर्डेकर यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पक्षप्रमुख अजित पवार व खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची सामाजिक न्यायविषयक धोरणे लोकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. नवीन पदभार स्वीकारताना सावर्डेकर यांनी सांगितले की, “सामाजिक समतेसाठी आणि वंचित घटकांच्या न्यायासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. पक्षाच्या विश्वासाला तडा जाऊ न देता, निष्ठेने कार्य करीन. त्यांच्या या निवडीचे अनेक सामाजिक संघटनांनी स्वागत केले आहे.
.................
बागेश्री सोसायटी निवडणूक बिनविरोध
खारघर, ता. ३१ (बातमीदार) : खारघर सेक्टर ४० मधील सिडकोच्या ‘बागेश्री गृहनिर्माण सोसायटी’मध्ये प्रथमच होणारी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडल्याने स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. सुमारे दोन हजार कुटुंबांनी वास्तव्य करणाऱ्या या सोसायटीमध्ये पूर्वी दोन गट निवडणुकीसाठी सज्ज झाले होते. परंतु सदस्यांच्या सामूहिक चर्चेनंतर निवडणूक न घेण्याचा निर्णय घेत सोसायटीच्या विकासावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणूक झाल्यास अंदाजे दहा लाखांचा खर्च निवडणूक अधिकारी मानधन, पोलिस बंदोबस्त, प्रचार साहित्य आदींसाठी अपेक्षित होता. परंतु एकजुटीने निर्णय घेऊन सर्व सदस्यांनी हा खर्च सोसायटीच्या विकासकामांसाठी वापरण्याचे ठरवले. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे सामाजिक सलोख्याचा आदर्श ठरली आहे. संकेत भंडारी, विकी भंडारी, दीपक चौथमल, विश्वास धनावडे, दादाराव इंगळे, रेशमा गुंजाळ, निर्मला परमार, संजीवन सकपाळ, विठ्ठल गवळी आदी सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. लवकरच पदाधिकाऱ्यांची निवड होणार असून नवीन कार्यकारिणी सोसायटीच्या कामकाजात पारदर्शकता आणेल, अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com