शिवसेनाच्या दोन्ही गटात वाद पेटला

शिवसेनाच्या दोन्ही गटात वाद पेटला

Published on

शिवसेनेच्या दोन्ही गटांतील वाद पेटला
शिंदे गटाची आंदोलनानंतर बॅनरबाजी; ठाकरे गटाने वादग्रस्त बॅनर फाडले
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : बच्चा विरुद्ध आजोबा अशी शिवसेनेच्या आजी-माजी खासदारांमध्ये शाब्दिक चकमकी घडल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा शिवसेनेचे दोन्ही गट समोरासमोर आले आहेत. याला निमित्त ठरले ते माजी खासदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी केलेल्या दहशतवादावरील कारवाईचे. विचारे यांच्या विधानावरून शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला असून मध्यरात्री बॅनरबाजी करण्यात आली. याची कुणकुण लागताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे वादग्रस्त बॅनर फाडून यापुढे जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांआधी ठाण्यात पुन्हा एकदा दोन्ही शिवसेनेत वाद पेटण्याची शक्यता आहे.

शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांना ‘बच्चा है वह’ असे म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी डिवचले होते. त्याला उत्तर म्हणून खासदार नरेश म्हस्के यांनी विचारे यांना ‘आजोबा’ संबोधून समाचार घेतला; पण हा वाद इथेच शांत झाला नाही. ही घटना ताजी असतानाच ‘ऑपरेशन महादेवअंतर्गत दहशतवाद्यांना ठार मारले म्हणजे मेहरबानी केली काय’ असे विधान माजी खासदार राजन विचारे यांनी केले. त्यामुळे शिंदे गटाच्या हातात आयते कोलीत मिळाले. त्यांनी बुधवारी (ता. ३०) राजन विचारे यांच्याविरोधात मनोरुग्णालयाबाहेर आधी आंदोलन केले. त्यानंतर थेट राजन विचारे यांना देशद्रोही संबोधून मध्यरात्री बॅनरबाजी करण्याचा प्रयत्न केला.

विचारे यांच्याविरोधात आंदोलन झाल्यानंतर बुधवारी ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेऊन यापुढे जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे विचारेंविरोधात ठाण्याच्या लुईसवाडी येथे बॅनर लागल्याची कुणकुण लागताच ठाकरे गटाचे कार्यकर्ते तेथे धडकले. त्यापूर्वी पोलिसांनी हा बॅनर हटवण्याचा प्रयत्न केला होता. त्याला शिंदे गटाचे कार्यकर्ते न जुमानता उलट राजन विचारे यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यास सुरुवात केली. त्याच वेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते तेथे धडकले आणि त्यांनी बॅनर फाडले. त्यामुळे दोन्ही गटांत तणाव वाढला. या घटनेचे पडसाद ठाण्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर सुरुवातीच्या काळात दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. त्यानंतर काही काळ वातावरण शांत होते; पण आता पुन्हा ठाण्यात राजकीय राडेबाजी होण्याची चिन्हे आहेत.

ठाकरे गटाचा इशारा
माजी खासदार राजन विचारे यांच्या देशभक्तीवर आणि निष्ठेवर बोट ठेवण्याचा अधिकार शिवसेना शिंदे गटाला नाही. सत्तेचा गैरवापर करून जर यापुढे दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना ठाकरे गट यापुढे शांत बसणार नाही. जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com