हक्काच्या मानधनासाठी महिला रस्त्यावर
हक्काच्या मानधनासाठी महिला रस्त्यावर
कर्मचाऱ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन
कल्याण, ता. ३१ (वार्ताहर) : महिला सक्षमीकरणासाठी सरकारच्या योजना बचत गटाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचविणाऱ्या शहापूर आणि भिवंडीमधील महिला कर्मचाऱ्यांना हक्काचे मानधन मिळत नाही. राज्याच्या इतर तालुक्यात हे काम करणाऱ्या महिलांना सहा हजार रुपये मानधन दिले जाते; मात्र शहापूर आणि भिवंडी परिसरात काम करणाऱ्या महिलांना तीन हजारच मानधन दिले जात असून, उर्वरित मानधन त्यांनी इतर उत्पन्नातून मिळविण्याची अट घातली आहे. या जाचक अटीविरोधात तसेच आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात भारतीय मजदूर संघ संलग्न कंत्राटी कर्मचारी संघ महाराष्ट्रच्या महिलांनी आंदोलनाचा आधार घेत बुधवारी कल्याणमधील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी संजय गर्जे यांना निवेदन देत आपल्या मागण्यांची दखल न घेतल्यास मंत्रालयापर्यत धडक देण्याचा इशारा दिला.
राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली असलेले महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे काम तालुका स्तरावर कम्युनिटी मॅनेजमेंट रिसोर्स सेंटरच्या माध्यमातून चालवले जाते. शहापूर आणि भिवंडी तालुक्यात सीएमआरएसच्या १६ शाखांमधून ८८० महिला कर्मचारी महिला सक्षमीकरणासाठीचे उपक्रम राबवतात; मात्र इतर तालुक्यात हे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना सहा हजार इतके मानधन दिले जात आहे, तर या शहापूर आणि भिवंडी तालुक्यातील कर्मचाऱ्यांना ४० टक्के मानधन देण्यात येते. उर्वरित मानधन इतर उत्पन्नातून मिळविण्याच्या सूचना त्यांना दिल्या जातात.
आत्मसन्मान निधी
मागील अनेक वर्षांपासून आपल्याला हक्काचे संपूर्ण मानधन मिळावे, अशी मागणी कर्मचारी करताना त्यांच्या मागणीची दखल वरिष्ठ पातळीवरून घेतली जात नसल्याने या महिलांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. इतर तालुक्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आपल्यालाही हक्काचे संपूर्ण मानधन मिळावे, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना अपघाती विमा योजना, भविष्य निर्वाह निधी योजना तसेच ठरावीक वर्षे अखंड सेवा केल्यानंतर आत्मसन्मान निधी दिला जावा, अशी मागणी या महिलांनी आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे. दरम्यान, या महिलांची मागणी रास्त असून, त्यांच्याकडून प्राप्त झालेले निवेदन वरिष्ठांना पाठवले जाईल. वरिष्ठ पातळीवरूनच हा प्रश्न सोडविणे शक्य असल्याचे गर्जे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.