बेलापूर सेक्टर ८ तलावाचे अस्तित्व धोक्यात
बेलापूरमधील तलावाचे अस्तित्व धोक्यात
तुर्भे, ता. ३१ (बातमीदार) : नवी मुंबईतील बेलापूर सेक्टर आठ परिसरातील पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या टेकड्यांच्या पायथ्याशी धारण तलावाचे सध्या अस्तित्व धोक्यात आले आहे. वन्य प्राणी आणि पक्ष्यांसाठी बारमाही पाण्याचा स्रोत ठरणाऱ्या या तलावात बेकायदेशीरपणे टाकल्या जाणाऱ्या डेब्रिजमुळे हे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. तलाव क्षेत्रात भराव टाकून रस्ता निर्माण केल्यामुळे तलावाचेच अस्तित्व धोक्यात आले आहे. याबाबत परिसरातील नागरिक चिंता व्यक्त करत आहेत.
सजग नागरिक मंच - नवी मुंबई या सामाजिक संस्थेने सिडको, नवी मुंबई महानगरपालिका आणि ठाणे वन विभागाकडे तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करुन तलावाचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी केली आहे.
बेलापूर सेक्टर आठ येथील टेकड्यांवर वनराई असल्याने येथे अनेक दुर्मिळ प्रजातींचे पक्षी, प्राणी आणि वन्यजीव वास्तव्य करतात. या भागातील नैसर्गिक पाण्याचा साठा कायमस्वरूपी राखण्यासाठी आणि पावसाळ्यात पूरपरिस्थिती टाळण्यासाठी सिडकोने येथे धारण तलावाची निर्मिती केली होती. या तलावामुळे पावसाळ्यात टेकडीवरून येणारे पाणी या ठिकाणी अडवले जाते. शिवाय हा तलाव हा वन्यजीवांसाठी, प्राणी, पक्षी यांच्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. नवी मुंबईस्थित मानवी जीव, पशुपक्षी आणि वन्यप्राणी यांच्या स्थैर्याच्या दृष्टीने पारसिक हिलचे महत्त्व अनन्य साधारण आहे. ही बाब लक्षात घेत सिडको वन विभाग व महानगरपालिका या शासकीय आस्थापनांनी पारसिक हिल टेकड्या, तलावाक्षेत्राचे संवर्धन करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे सजग नागरिक मंचाच्या सदस्या त्रिशीला कांबळे यांनी म्हंटले आहे.
तलावाची दुर्दशा
गेल्या काही दिवसांपासून पर्यावरणाप्रती असणाऱ्या असंवेदनशील दृष्टिकोनामुळे या तलावात मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकले जाते आहे. त्यामुळे तलावाचा व्यास कमी होत असून खोली ही कमी झाली आहे. परिणामी या तलावाची पाणी साठवण्याची क्षमता कमी होत चालली आहे. शिवाय तलावाची दुर्दशा वाढली आहे. जमिनीवरील वस्तुनिष्ठ वास्तव जाणून घेण्यासाठी सिडको, वनविभाग व महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे स्थळभेट द्यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे निवेदनाद्वारे केली आहे.
पर्यावरण रक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक
पारसिक हिल टेकडीचा परिसर हा मोठ्या प्रमाणात पसरलेला असल्याने या भागातील वन्यजीवांसाठी सिडकोने सेक्टर नऊमधील ग्रीन व्हॅली भागात टेकड्यांच्या पायथ्याशी मोकळी जागा उपलब्ध आहे. त्या ठिकाणी नवीन धारण तलाव तयार करावा. या तलावाच्या जलसाठ्याचा वापर करत पालिकेने वड, पिंपळ, चिंच, कडुनिंब, आंबा यांसारख्या देशी वृक्षांची लागवड करावी, अशी मागणीही केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.