गणेशोत्सवासाठी जय्यत तयारी
गणेशोत्सवासाठी जय्यत तयारी
नवी मुंबईत मंडळांची लगबग; वॉटरप्रूफ मंडपांची पसंती
तुर्भे, ता. ३१ (बातमीदार) : गणेशोत्सव अद्याप काही आठवड्यांवर येऊन ठेपला असला तरी नवी मुंबईतील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सवाच्या तयारीला सुरुवात केली आहे. बाप्पाच्या आगमनासाठी मंडप उभारणीचे काम जोमात सुरू झाले असून, अनेक मंडळांनी वेळेत तयारी पूर्ण होण्यासाठी आतापासूनच कंबर कसली आहे.
नवी मुंबईत सुमारे ६४ सार्वजनिक गणेश मंडळे कार्यरत आहेत. यातील अनेक मंडळांना दशकानुदशकांची परंपरा लाभली असून, दरवर्षी नावीन्यपूर्ण मूर्ती आणि देखावे सादर करण्याची स्पर्धा लागते. यंदाही लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी मंडप उभारणी, देखावे, आरास याची तयारी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. गेल्या काही वर्षांत मंडप उभारणीमध्ये पारंपरिक बांबू-ताडपत्रीच्या मंडपांऐवजी आधुनिक जर्मन तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात पावसाची शक्यता लक्षात घेता अनेक मंडळांनी वॉटरप्रूफ मंडपांची निवड केली आहे. गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी विविध मित्रमंडळे व सार्वजनिक मंडळांचे शेकडो कार्यकर्ते रात्रंदिवस कामाला लागले आहेत. अंतर्गत देखाव्यांचे स्ट्रक्चर, विद्युत रोषणाई, पारंपरिक आरास अशा अनेक अंगांनी कामे सुरू आहेत. काही मंडळांनी यंदा भव्य थीमबेस्ड देखावे साकारण्याचा संकल्प केला असून त्यासाठी कारागिरांची धावपळ सुरू आहे. शिवछाया मित्र मंडळ, तुर्भेचे कार्यकर्ते अंकुश वैती यांनी सांगितले की, मंडप उभारणीचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. अंतर्गत देखाव्यांसाठी अधिक वेळ लागतो, म्हणून महिनाभर आधीच आम्ही मंडप उभारणी सुरू केली आहे. तर नवी मुंबईकर गणेशभक्तांमध्येहीदेखील बाप्पाच्या आगमनाबाबत उत्साह दिसून येत आहे.
............
पर्यावरणपूरक बाप्पासाठी पुढाकार
यंदा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यामुळे लाडक्या गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी नवी मुंबई परिसरातील अनेक छोट्या मोठ्या सार्वजनिक गणेशउत्सव मंडळाच्या व मित्रमंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे. आगामी गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि सुरक्षित करण्यासाठी अनेक मंडळांनी सजगपणे मंडप उभारणीसाठी पाऊले उचलली आहेत. मंडळाच्या कार्यकर्त्यांची मेहनत वाया जाऊ नये, तसेच देखावे पाण्याने भिजू नयेत यासाठी यंदाच्या वर्षीदेखील वॉटरप्रूफ मंडप उभारणीला पसंती देण्यात येत आहे. लोखंडी पत्रे, प्लॅस्टिक बारदान, आणि पूर्ण प्लॅस्टिक पेपरच्या सहाय्याने बंदिस्त मंडपांची उभारणी केली जात आहे. यामुळे देखावे आणि मूर्ती भिजण्यापासून सुरक्षित राहण्यास मदत होत आहे.