स्मार्ट मीटरविरोधात शेकापची महावितरण कार्यालयावर धडक
स्मार्ट मीटरविरोधात शेकापची महावितरण कार्यालयावर धडक
अलिबाग, ता. ३१ (वार्ताहर) ः महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांच्याकडून सक्तीने बसविण्यात येणारी स्मार्ट मीटर जोडणी रद्द करावी यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने अलिबाग येथील महाराष्ट्र विद्युत मंडळ कार्यालयात गुरुवारी (ता. ३१) धडक दिली. याबाबात निवेदनही सादर केले आहे.
अलिबाग तालुक्यातील व शहरातील विद्युत ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावण्याची सक्ती तत्काळ रद्द करावी, विद्युतग्राहकांचे स्मार्ट मीटर काढून पूर्वीचीच मीटर पुनर्जोडणी करावी. तालुक्यातील व शहरातील ग्राहकांना विश्वासात न घेता बसविलेल्या स्मार्ट मीटरने आलेली भरमसाट वीजबिले तत्काळ रद्द करावीत, स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी नियमित पद्धतीने येत असलेल्या युनिटनुसार बिलांच्या प्रमाणातच वीजबिले आकारण्यात यावीत, स्मार्ट मीटर तत्काळ रद्द करण्याचे लेखी द्यावे, अशा मागण्या केल्या आहेत. या मागण्या मान्य न केल्यास भविष्यात जनआंदोलन छेडण्याचा इशारादेखील दिला आहे.
या वेळी शेकापच्या प्रदेश महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत, अलिबाग शहर चिटणीस अनिल चोपडा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.