जुने सरकते जिने बदलापूरकरांच्या माथी
बदलापूर, ता. ३१ (बातमीदार) : कोट्यवधींचा महसूल देणाऱ्या बदलापूरच्या दीड लाख प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसण्याची कामे रेल्वे प्रशासनाने केल्याचा दावा महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. रेल्वेस्थानकाचे अद्ययावतीकरण करताना जुने सरकते जिने बसवून बदलापूरकरांची फसवणूक केल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. या संदर्भात रेल्वेस्थानकावर येऊन सरकत्या जिन्याची पाहणी केली असता, ही बाब खरी असल्याचे दाखवत कामाची पोलखोल केली आहे.
मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे आणि रेल्वेला सर्वाधिक महसूल देणाऱ्या स्थानकांमध्ये बदलापूर हे महत्त्वाचे स्थानक आहे. असे असूनही आम्हाला अशी सापत्न वागणूक रेल्वे प्रशासनाकडून दिली जात असल्याची खंत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी व्यक्त केली आहे. बदलापूर स्थानकातून लाखों प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. आमच्याकडे रेल्वे फेऱ्या कमी आहेतच. हा अन्याय होत असताना आता जुने साहित्य आम्हाला नवीन करून दिले जात आहे. यात आमची फसवणूक होत असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे शहरप्रमुख किशोर पाटील यांनी केला आहे. हा जिना काढून या ठिकाणी नवीन सरकता जिना बसवण्याची मागणी मविआने केली आहे. जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर, मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा मविआने दिला आहे. या वेळी रेल्वेस्थानकावर मविआचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
इतर स्थानकांवरील वापरात नसलेले सरकते जिने बदलापूरकरांच्या माथी मारले जात आहेत. दीड लाख बदलापूरकर रेल्वेने रोज प्रवास करतात. त्यांच्याकडून मिळणाऱ्या कोट्यवधी रुपये निधीचा प्रशासन अशा प्रकारे वापर करते का? जुने साहित्य नवीन करून दिले जात आहे. हे सहन करणार नाही. लवकरच हा जिना बदलण्यात यावा; अन्यथा मोठे जनआंदोलन उभारू.
- अविनाश देशमुख, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस
सार्वजनिक निधीचा अपव्यय न करता, जबाबदारीने तो निधी वापरण्याच्या सूचना आहेत. बदलापूर रेल्वे प्रवाशांची कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी सहा नवीन आणि वाढीव दोन स्थलांतरित असे एकूण आठ सरकते जिने बदलापूर स्थानकात उभारत आहोत. कल्याण-बदलापूर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या प्रकल्पासाठी ट्रॅक अलाइनमेंटच्या कामासाठी उल्हासनगर फलाट क्रमांक एकवर २०१६मध्ये सरकता जिना वापरात आला. त्याचे अजूनही २१ वर्षांचे आयुर्मान शिल्लक आहे. तो स्थलांतरित करून बदलापूर स्थानकात त्याचा पुनर्वापर करण्यात येत आहे. या सरकत्या जिन्याची त्याच्या उत्पादक कंपनीकडून तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतरच हा जिना बदलापूर स्थानकात उभारण्यात येत आहे.
- सुनील उदासे, मुख्य जनसंपर्क अधिकारी,
एमआरव्हीसी प्रशासन