भिवंडी वाडा रस्त्याचे काम ठेकेदार कंपनीने थांबविले

भिवंडी वाडा रस्त्याचे काम ठेकेदार कंपनीने थांबविले

Published on

भिवंडी वाडा रस्त्याचे काम ठेकेदाराने थांबविले
पैसे दिले नसल्याने काम पाच दिवसांपासून बंद ः प्रवाशांचे अतोनात हाल
वाडा, ता. ३१(बातमीदार) ः भिवंडी-वाडा रस्त्याचे काम गेल्या चार-पाच दिवसांपासून बंद असल्याने विशेषतः प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. निधी मिळाला नसल्याने हे काम बंद असल्याचे कंपनीकडून सांगितले जात आहे. शासन व ठेकेदार कंपनीमुळे प्रवासी व सामान्य नागरिक मात्र भरडला जात असल्याने नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
भिवंडी, वाडा, मनोर या रस्त्याच्या सिमेंट क्राॅंकीटीकरणाचे काम इगल या ठेकेदार कंपनीला मिळाले असून यासाठी ८०२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कंपनीने हे काम सुरू केले असून तानसा पूल ते कुडूस या अंतरापर्यंत काम काही टप्पे वगळता पूर्ण झाले आहे. तर, शिरीष पाडा ते वाडा खंडेश्वरी नाका येथेपर्यंत काम काही टप्पे वगळता एका बाजूचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. आता एका बाजूला संपूर्ण खोदकाम केले आहे. त्यातच सद्यस्थितीत रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून यामुळे नित्याचीच वाहतूक कोंडी होत आहे. याचा त्रास वाहनचालकांसह नागरिकांना होत असून नागरिक हैराण झाले आहेत.

याची दखल घेऊन श्रमजीवी संघटनेने काही दिवसांपूर्वी भिवंडी-वाडा महामार्गावर एकाच वेळी अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन छेडून प्रशासनाला जाब विचारला होताय याची दखल घेत प्रशासनाने रस्ता सुस्थितीत करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. आंदोलनानंतर काही दिवस रस्त्याची दुरुस्ती करून रस्ता सुस्थितीत करुन दिला होता. मात्र, आता पुन्हा खड्ड्यात गेला असून त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. आता तर शासनाकडून पैसे मिळाले नाहीत म्हणून गेल्या चार पाच दिवसांपासून काम बंद करण्यात आले असल्याने वाहनचालक प्रवाशांसह नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

दुसऱ्या ठेकेदाराला काम द्यावे
शासनाकडून पैसे न मिळाल्याने गेल्या चार पाच दिवसांपासून काम बंद करण्यात आले असल्याचे समजले आहे. या कंपनीकडून काम काढून घेऊन निविदेतील दुसऱ्या क्रमांकांच्या ठेकेदार कंपनीला हे काम देण्यात यावे. जर काम करण्याची ठेकेदार कंपनीची कुवत नसेल तर प्रशासनाने हा निर्णय घ्यावा, असे काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी म्हंटले आहे.

बिल प्रलंबित; काम ठप्प
बांधकाम विभागाकडे आत्तापर्यंतच्या झालेल्या कामाचे बिल पाठवण्यात आले असून प्रशासनातील कोणीही यावर बोलायला तयार नाही. आत्तापर्यंत ठेकेदार कंपनीला एक रूपयाही मिळालेला नाही. मागील वेळी झालेल्या आंदोलनामुळे कंपनीने दीड कोटी रूपये खर्च करून खड्डे बुजविले आहेत. ते पैसे आम्हाला मिळणार नाहीत, आता मशिनरीमध्ये टाकायला डिझेल नाही. त्यामुळे आम्ही हे काम बंद ठेवले आहे, असे इगल कंपनी व्यवस्थापक दिनेश सिंग यांनी म्हंटले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com