उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांचा गौरव
उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांचा गौरव
नवी मुंबई पालिकेतर्फे स्वच्छता पारितोषिक वितरण
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३१ ः नवी मुंबई शहराचे केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४मध्ये देशातील शहरांच्या क्रमवारीपेक्षा उच्च स्तरावरील सुपर स्वच्छ लीग या स्पेशल कॅटेगरीत मानांकित झाले आहे. त्यानिमित्ताने महापालिकेने आयोजित केलेल्या स्वच्छ सोसायटी, स्वच्छ शाळ-महाविद्यालय, स्वच्छ मार्केट, स्वच्छ रुग्णालय, स्वच्छ हॉटेल आणि स्वच्छ शासकीय कार्यालय अशा विभाग स्तरावरील स्वच्छता स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ महापालिका मुख्यालयात पार पडला. या प्रसंगी शहरात सर्वोत्तम स्वच्छतेचे काम करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यात आला.
नवी मुंबई शहर स्वच्छ सर्वेक्षणामध्ये आता देशातील इतर शहरांच्या तुलनेत वरच्या स्थानावर असून, सुपर स्वच्छ लीगमधील आपले सर्वोच्च स्थान कायम राखण्यासाठी ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी सांगितले. तसेच आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून आपण त्यामध्ये नक्की यशस्वी होऊ, असा विश्वासही व्यक्त केला. नवी मुंबई महापालिका कचरा वर्गीकरणाकडे प्राधान्याने लक्ष देत असून, अगदी गावठाण व झोपडपट्टी भागावर विशेष लक्ष देत तेथील गल्लोगल्लीत पोहोचून कचरा वेगवेगळा गोळा करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त स्मिता काळे यांनी नवी मुंबईला लाभलेले सुपर स्वच्छ मानांकन हे सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित असल्याचे सांगत यापुढील काळात आपण सर्व जण मिळून अधिक उत्तम कामगिरी करू, असे आवाहन त्यांनी केले.
‘या’ संस्थांचा गौरव
महापालिका क्षेत्र स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत सर्वात स्वच्छ हॉटेलचा सन्मान हॉटेल विवांता नेरूळ यांनी पटकावला. छत्रपती शाहू महाराज विद्यालय शाळा क्र. ५५, रबाळे ही नवी मुंबई महापालिका शाळा गटातून तसेच रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, सेक्टर १६, वाशी यांनी खासगी शाळा व महाविद्यालय गटातून स्वच्छ शाळेचा बहुमान मिळविला. सेक्टर ५४, ५६, ५८ नेरूळ येथील एनआरआय कॉम्प्लेक्स फेज-१ सर्वात स्वच्छ सोसायटी ठरली. तसेच डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, नेरूळ सेक्टर-५ हे सर्वात स्वच्छ रुग्णालय पुरस्काराने सन्मानित झाले. नवी मुंबई महापालिका अग्निशमन केंद्र, वाशी हे सर्वात स्वच्छ शासकीय कार्यालयाचे मानकरी ठरले आणि श्रमिक जनता फेरीवाला सेक्टर-८ कोपरखैरणे सर्वात स्वच्छ मार्केटचे विजेते ठरले. यामध्ये सर्वोत्कृष्ट तीन क्रमांकांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व काही गटांत रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.