आणि..न्यायालयाचे छावणीत रुपांतर झाले
न्यायालयाच्या परिसराला छावणीचे रूप!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर निकाल येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कोणाताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गुरुवारी (ता. ३१) सकाळपासूनच सत्र न्यायालयाच्या परिसराला छावणीचे रूप आले होते. सत्र न्यायालयाच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पोलिसांच्या तुकड्या टप्प्याटप्प्याने तैनात होत्या. ठरावीक अंतरावर अडथळे उभारण्यात आले होते. प्रत्येकाचे ओळखपत्र तपासूनच न्यायालयात प्रवेश दिला जात होता. सकाळी दहाच्या सुमारास मालेगाव खटल्याशी संबंधित आरोपींनी न्यायालयात येण्यास सुरुवात केल्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांच्या भोवती एकच गराडा घातल्यानंतर पोलिसांनी सुरक्षा आणखी वाढवली. साध्वी प्रज्ञासिंह या पुढच्या प्रवेशद्वारातून न्यायालयात दाखल झाल्या. तर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित हे त्यांच्या सैन्यदलाच्या वाहनातून त्यांच्या सुरक्षा रक्षकांसह न्यायालयात हजर झाले, त्या वेळी त्यांचे कुटुंबीयही त्यांच्यासमवेत होते.
मालेगावशी संबंधित खटला विशेष एनआयए न्यायालयात होणार होता. त्या कोर्टरूमच्या आत आणि बाहेरही पोलिसांचा फौजफाटा होता. विशेष न्यायालयात नोंदणी केलेल्या प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींनाच प्रवेश देण्यात येत होता. विशेष न्यायालयाने प्रसिद्धिमाध्यमांवर काही निर्बंध घातले होते. याशिवाय, मोबाइल फोन आणण्यास बंदी, छोटी वही आणि पारदर्शी पेन घेऊनच न्यायालयात प्रवेश करण्याची अट घातली होती. कोर्टरूममध्ये न्यायाधीशांच्या कर्मचारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, वकिलांचे सहकारी यांच्याशिवाय कोणालाही प्रवेश नव्हता. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी न्यायालयात प्रवेश केला. मोबाईल फोन घेऊन न्यायदालनात प्रवेश करण्याची परवानगी नंतर दिली गेली. निकालपत्र देताना फोन बंद करून ठेवण्याचे न्यायालयाने स्पष्ट करताच न्यायालयात उपस्थित प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याला विरोध केला. तसेच, मोबाईल केवळ सुनावणीतील घडामोडी कार्यालयाला कळवण्यासाठी केला जाईल आणि सुनावणीचे चित्रीकरण केले जाणार नाही, अशी हमी दिल्यानंतर मोबाईल वापराला न्यायालयाने परवानगी दिली.
-----
वकिलाने काढला साध्वीचा फोटो
न्यायालयाने निकालाचे वाचन केल्यानंतर तांत्रिक त्रुटीवर काम सुरू असताना कोर्टरूममध्ये उपस्थित वकिलाने न्यायालयात उपस्थित असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा नकळत फोटो काढला. न्यायालयीन शिरस्तेरादारांनी वकिलाने फोटो काढल्याची माहिती न्यायालयाला दिली. न्यायालयाने पोलिसांना वकिलाने फोटो अथवा व्हिडिओ काढल्याचे तपासण्यास सांगितले. वकिलाने फोटो व्हॉट्सॲपवरून पाठवल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. न्यायालयीन शिष्टाचार भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर अवमान कारवाई का करू नये, अशी विचारणा केली. त्यावर वकिलाने दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर फोटो आणि व्हॉट्सॲप चॅट काढून टाकण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.