पाच मजली इमारत कोसळली
पाच मजली इमारत कोसळली
धोकादायक इमारती मृत्यूचा सापळा
उल्हासनगर, ता. १ (वार्ताहर) : कॅम्प तीनमधील सी ब्लॉक परिसरातील शिव जगदंबा अपार्टमेंट ही पाच मजली इमारत गुरुवारी (ता. ३१) रात्रीच्या सुमारास कोसळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र कोसळलेल्या मलब्यामुळे शेजारील घरांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून महापालिकेच्या दिरंगाईवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
शिव जगदंबा अपार्टमेंट ही इमारत जीर्ण अवस्थेत होती. महापालिकेने यापूर्वी ही इमारत धोकादायक घोषित करून सील केली होते. या इमारतीत एकूण २९ सदनिका आणि दोन दुकाने होती; मात्र महापालिकेने या धोकादायक इमारतीचे पाडकाम लांबणीवर टाकले होते, अखेर गुरुवारी रात्री अचानकपणे ही इमारती तळमजल्यापर्यंत खाली कोसळला. या वेळी मोठा आवाज झाल्याने व मलबा शेजारील घरांवर आदळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी पोहोचून परिसरातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविले. सुदैवाने यामध्ये कोणताही जीवितहानी झाली नाही; मात्र अशा प्रकारच्या धोकादायक इमारती उभ्या असणे हेच शहरातील प्रशासनाच्या अपयशाचे प्रतीक असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे ‘महापालिकेने वेळेत ही इमारत पाडली असती, तर आमच्या घरांचे आणि संसाराचे इतके नुकसान झाले नसते,’ अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली.