नालेसफाई कामाचे पितळ ‘एआय’ने उघडे पाडले
नालेसफाई कामाचे पितळ ‘एआय’कडून उघडे
पालिकेकडून कंत्राटदारांना १५ कोटींचा दंड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मुंबई महापालिकेने यंदाच्या नालेसफाई मोहिमेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीचा वापर करून थेट कंत्राटदारांच्या कामावर लक्ष ठेवायला सुरुवात केली. या डिजिटल यंत्रणेमुळे कंत्राटदाराच्या कामातील अनियमितता समोर आली आहे. त्यामुळे सुमारे १५ कोटी रुपयांचा दंड कंत्राटदारांवर ठोठावण्यात आला आहे. नालेसफाईचे पितळ एआयने उघडे पाडल्याने पालिकेला त्याचा आर्थिक फायदाही झाल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
मुंबईतील लहान-मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी निविदा प्रक्रियेद्वारे २३ कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ८९.१४ टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाले असून, एआय प्रणालीच्या मदतीने या कामांवर लक्ष ठेवण्यात आले. पालिकेने प्रत्येक नालेसफाईच्या कामासाठी ३० सेकंदांचा व्हिडिओ आणि फोटो जमा करणे कंत्राटदारांना बंधनकारक केले आहे. हे सर्व व्हिडिओ जिओ-टॅगिंगसह अपलोड केले जात असून, याच आधारे कामाचे विश्लेषण एआय प्रणालीद्वारे होते. लहान नाल्यांमध्ये तर पूर्वी आणि नंतरचे सीसीटीव्ही चित्रीकरण अनिवार्य करण्यात आले आहे.
या आधुनिक प्रणालीमुळे ज्या कामांमध्ये जिओ-टॅगिंग नव्हते, तिथे गाळ उपसण्याचे दावे अमान्य करण्यात आले. तसेच, गाळ नेणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्या, त्याचा वेळ व प्रवासमार्ग यावरही एआयद्वारे लक्ष ठेवले जात आहे. यामुळे अनेक ठिकाणी अनियमितता उघडकीस आली. प्रशासनाच्या लक्षात आल्यावर कंत्राटदाराच्या हातसफाईवर कारवाई करण्यात आली आहे.
एआयच्या माध्यमातून नालेसफाईच्या कामातील आढळून आलेल्या विविध त्रुटींबाबत कंत्राटदारांवर दंडाची आकारणी करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण १५ कोटींपेक्षा जास्त दंड आकारण्यात आला असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.
...........................
नालेसफाई सद्यस्थिती (मेट्रिक टन)
प्रकार - एकूण - काम पूर्ण - टक्क्यांमध्ये
शहर - ३०,३२४.९८ ३१,०५०.१४ १०० टक्के
पूर्व उपनगरे - १,२२,५६०.३४ १,३१,६१८.८२ १०० टक्के
पश्चिम उपनगरे - २,०५,९६४.७८ २,२५,६७८.३९ १०० टक्के
छोटे नाले - ३,९४,७१८.९८ ३,११,४८५.०० ७८.९१ टक्के
मिठी नदी - २,१४,३१५.४९ १,६२,९०२.८७ ७६.०१ टक्के
एकूण - ९,६७,८८४.५७ ८,६२,७३५.२२ ८९.१४ टक्के
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.