
यवतमाळमध्ये ठाकरे गटाला खिंडार
ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत सात नगरसेवक शिवसेनेत
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : यवतमाळमधील नेर नगरपालिकेच्या तीन माजी नगराध्यक्षांसह पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ठाण्यात गुरुवारी (ता. ३१) रात्री उशिरा झालेल्या या पक्ष प्रवेशाला मंत्री संजय राठोड उपस्थित होते.
पक्ष प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की अडीच वर्षे महायुतीचा मुख्यमंत्री असताना राज्यात विकासाची कामे केली. लाडकी बहीण, लाडके भाऊ, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक अशा सगळ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याचे काम सरकारने केले. या कामाची पोचपावती म्हणून विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळाले. लाडक्या बहिणींनी महाविकास आघाडीचे चारी मुंड्या चीत केले. ज्यांना सत्तेत येण्याची स्वप्न पडत होती, ती धुळीस मिळाली. दिल्ली दौऱ्यावर असताना यवतमाळमधील पदाधिकारी पक्ष प्रवेशासाठी ठाण्यात हे सर्व कार्यकर्ते एक दिवस मुक्कामी राहिले, याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कौतुक केले. नेर नगरपालिकेचे ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल, माजी नगराध्यक्ष सुनीता जयस्वाल, वनिता मिसळे, नगरसेवक संदीप गायकवाड, दिलीप म्हस्के, साजिद शरिफ, नगरसेविका सरिता सुने, दर्शना इंगोले, ठाकरे गटाचे अल्पसंख्याक आघाडी माजी जिल्हाध्यक्ष रिझवान खान, गणेश शीलकावार, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस लोकेश इंगोले, माजी जिल्हा परिषद सदस्य राकेश नेमनवार, पंचायत समिती उपसभापती संतोष बोडेवार, माजी सभापती अभय डोंगरे, विविध सहकारी संस्थेचे अध्यक्ष विलास ठाकरे, संचालक राहुल देहणकर, ठाकरे गटाचे महागाव शहर समन्वयक अविनाश देशमुख, भाजपचे पदाधिकारी तेजस ठाकरे आदींनी शिवसेनेत प्रवेश केला.
पश्चिम विदर्भातील १० हजार पदाधिकारी शिवसेनेत : संजय राठोड
पश्चिम विदर्भातील १० हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यवतमाळमध्ये हा प्रवेशाचा सोहळा होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून विदर्भातील किमान १० हजार कार्यकर्ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.