कर्जत-बेलापूर बससेवा सुरू
कर्जत, ता. २ (बातमीदार)ः नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाने कर्जत ते बेलापूर रेल्वेस्थानक अशी बससेवा सुरू केली आहे. यापूर्वी ही सेवा केवळ शहराच्या पश्चिमेकडील एसटी स्थानकातून उपलब्ध होती. नवी मुंबई महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी थेट कर्जतच्या अग्निशमन केंद्राजवळून मार्ग क्रमांक ४९ बससेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू केली आहे. सोमवार ते शनिवारदरम्यान नियमित सेवा असून, रविवारी आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी ३२ फेऱ्यांची सेवा दररोज सुरू आहे. पहिली बस सकाळी ५.४० वाजता बेलापूरहून, तर कर्जतहून साडेसहा वाजता पहिली बस सुटते. तर रात्री उशिरा ११.४५ पर्यंत ही सेवा आहे. या सुविधेमुळे पूर्व भागातील नागरिकांसह विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
-------------------------------------
प्रवासासाठीचे वेळ, पैसे वाचणार
कर्जतहून बेलापूरला येण्यासाठी पूर्वी एसटी बस किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे वेळेबरोबर आर्थिक भुर्दंडही पडत होता; पण आता शहरातूनच ही सेवा सुरू झाल्याने विद्यार्थी, नोकरदार, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना नवी मुंबई, पनवेल, बेलापूरकडे जाण्यासाठी खर्ची पडणारा वेळ, पैसेही वाचणार आहेत.