नवी मुंबईत २२ पोलिस ठाणी

नवी मुंबईत २२ पोलिस ठाणी

Published on

नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ, विविध प्रकल्प, रोजगाराच्या संधीमुळे नवी मुंबई, पनवेल, उरण परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येबरोबर कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाची पुनर्रचना होणार असून तीन परिमंडळे, २२ पोलिस ठाणी असणार आहेत.
सिडकोच्या माध्यमातून १९७० मध्ये नवी मुंबईच्या निर्मितीस सुरुवात झाल्यानंतर नवी मुंबईचा झपाट्याने विस्तार झाला. या भागात अनेक नामांकित शिक्षण संस्था, आयटी कंपन्यामुळे नवी मुंबईची स्मार्ट सिटी म्हणून ओळख झाली. शहरातील उद्योगधंदे, उत्तम निवासाची सोय, मुबलक पाणी, शैक्षणिक संस्थांचे पसरलेले जाळे, दळणवळणाची साधने, त्यामुळे मुंबई- ठाणे- पुणे यांच्या मध्यवर्ती असलेल्या नवी मुंबईच्या लोकसंख्येत भर पडली आहे. प्रस्तावित असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो रेल, सागरी सेतू प्रकल्पामुळे वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत पोलिस बळ अपुरे पडू लागले आहे. नवी मुंबई पोलिस दलाला कर्मचारी तसेच पोलिस ठाण्याची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नवी भौगोलिक परिस्थिती, पोलिस ठाण्यामध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या, परिसरातील लोकसंख्या, औद्योगिक क्षेत्र या बाबींचा विचार करून नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवला होता.
----------------------------------
परिमंडळ दोन एनआरआयमध्ये कार्यान्वित
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या पुनर्रचनेनुसार विद्यमान परिमंडळ एक (वाशी) व परिमंडळ दोन (पनवेल) यांच्या पुनर्रचनेतून नवे परिमंडळ तीन (बेलापूर) स्थापन करण्यात आले आहे. नव्या परिमंडळ दोनचे उपायुक्त म्हणून गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमित काळे यांची नियुक्ती केली आहे. या नव्या परिमंडळाचे कार्यालय एनआरआय पोलिस ठाण्यात कार्यान्वित करण्यात येणार आहे. या ठिकाणी कार्यालयाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे.
-----------------------------------
पोलिस ठाण्याची विभागणी
परिमंडळ एक ः
- वाशी पोलिस ठाण्याची संख्या सात होणार आहे.
- रबाळे विभाग सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे जबाबदारी. रबाळे, रबाळे एमआयडीसी, कोपरखैरणे पोलिस ठाण्याचा समावेश असणार आहे.
- सहाय्यक पोलिस आयुक्त वाशी यांच्या अधिपत्याखाली वाशी, एपीएमसी, तुर्भे, सानपाडा पोलिस ठाण्याचा समावेश.
----------------------------
परिमंडळ दोन ः
- बेलापूरअंतर्गत आठ पोलिस ठाणी येणार आहेत. बेलापूर सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे जबाबदारी.
- सीबीडी, एनआरआय, नेरूळ व प्रस्तावित विमानतळ पोलिस ठाण्याचा समावेश आहे.
- पोर्ट विभागाच्या अधिपत्याखाली उलवा, न्हावा-शेवा, उरण आणि मोरा सागरी या चार पोलिस ठाण्यांचा समावेश.
---------------------------
परिमंडळ तीन ः
- पोलिस ठाण्यांची संख्या सात होणार आहे. खारघर विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांवर जबाबदारी.
- खारघर, कळंबोली, कामोठे आणि तळोजा चार पोलिस ठाण्यांचा समावेश आहे.
- पनवेल विभागात पनवेल शहर, पनवेल तालुका, खांदेश्वर पोलिस ठाण्याचा समावेश आहे.
------------------------------
द्रोणागिरी, करंजाडेचाही समावेश
- नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या पुनर्रचनेत कामोठे पोलिस ठाण्याचा समावेश नव्याने निर्माण होणाऱ्या सहाय्यक पोलिस आयुक्त खारघर विभागामध्ये करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे स्थानिक नेते, पोलिस मित्र चंद्रशेखर सोमण यांनी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली.
- नागरिकांच्या सोयीसाठी कामोठे पोलिस ठाणे पनवेल विभागात ठेवण्याची विनंती केली. या वेळी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी आयुक्तालयाच्या पुनर्रचनेबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत द्रोणागिरी, करंजाडेसह आणखी तीन पोलिस ठाण्यांचा प्रस्ताव असल्याचे संकेत दिले आहे.
-------------------------------
विमानतळासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे
नवी मुंबई विमानतळाचे काम वेगाने सुरू असून पूर्णत्वास येणार आहे. विमानतळाच्या सभोवताली नागरीकरण विकसित झालेले आहे. विमानतळ आणि परिसराच्या सुरक्षेसाठी पोलिस आयुक्तालयाकडून विमानतळासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू करण्यात येणार आहे. काही दिवसांमध्ये हे पोलिस ठाणे कार्यान्वित होणार आहे.
------------------------------------
नवी मुंबई आयुक्तालयाची भौगोलिक परिस्थिती, पोलिस ठाण्यामध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या, निर्माण होणारे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न, परिसरातील लोकसंख्या, औद्योगिक क्षेत्र इत्यादी बाबींचा तसेच पुढील २० वर्षांचा विचार करून नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाची पुनर्रचना करण्याच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली आहे.
- संजयकुमार पाटील, पोलिस उपायुक्त मुख्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com